Tue, Jun 18, 2019 23:26होमपेज › Sangli › सांगलीत युवकाचा निर्घृण खून

सांगलीत युवकाचा निर्घृण खून

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 28 2018 12:58AMसांगली : प्रतिनिधी

संजयनगर येथील अभयनगर बसस्टॉपजवळील एका फर्निचरच्या दुकानात मंगळवारी सायंकाळी डोळ्यांत चटणी टाकून आणि तीक्ष्ण हत्याराने  वार करून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. संजय शिवाजी जाधव (वय 35, रा. संजयनगर, मूळ रा. फरिदखानवाडी, उगार खुर्द, ता. अथणी) असे त्याचे नाव आहे. एका हल्लेखोराने हा खून केल्याचे घटना पाहणार्‍यांनी सांगितले. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली. 

घटना प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी : संजयनगर येथील स्टेट बँक कॉलनीसमोर अभयनगर बसस्टॉप आहे. येथे सुनील म्हारनूर यांच्या मालकीचा गुडलाईन फर्निचर इंडस्ट्रीज नावाचा फर्निचर तयार करण्याचा कारखाना आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संजय जाधव प्लायवूड खरेदी करण्यासाठी या कारखान्यात मोटारसायकलवरून (के.ए. 23-इडी 9529) आला होता. प्लायवूड खरेदी  केल्यानंतर तो कारखान्यातून बाहेर आला. 

कारखान्याच्या बाहेरच उभ्या केलेल्या त्याच्या मोटारसायकलजवळ तो पोहोचला. त्यावेळी तोंडाला रूमाल बांधलेला एक युवक त्याच्या दिशेने आला. संजयला काही कळायच्या आत त्याने त्याच्या डोळ्यात चटणी पूड फेकली. अचानक घडलेल्या या घटनेने भांबावलेला संजय हातातील प्लायवूड गाडीजवळच टाकून फर्निचरच्या कारखान्यात घुसला. हल्लेखोराने तलवारीसारखे धारदार हत्यार घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. 

यावेळी संजयचा हत्यारबंद हल्लेखोराकडून पाठलाग होत असल्याचे पाहून कारखान्यातील कामगार भीतीने हातातील काम टाकून बाहेर पळून गेले. त्यानंतर हल्लेखोराने तीक्ष्ण हत्याराने संजयच्या गळ्यावर सपासप वार केले.  घाव वर्मी बसल्याने तो तेथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. 

संजय ठार झाल्याची खात्री झाल्यानंतर हल्लेखोर शांतपणे कारखान्यातून बाहेर पडला. समोरील रस्ता त्याने चालत ओलांडला; पण तेथून तो कोठे गेला त्याची माहिती मिळाली नसल्याचे घटना पाहणार्‍यांनी  सांगितले. 

दरम्यान कारखान्यातील कामगारांनी याची माहिती मालक सुनील म्हारनूर यांना दिली.  खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदेवे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनीही भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. 
खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून हल्लेखोराचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आल्याचे उपअधीक्षक वीरकर यांनी  पत्रकारांना  सांगितले. घटनास्थळी पंचनामा झाल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आला. याबाबत रात्री उशिरा संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मान, डोके, चेहर्‍यावर वार

संजयच्या डोके, मान आणि चेहर्‍यावरच वार केल्याचे दिसून आले. अन्यत्र कोठेही कसलीही जखम नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.