Sat, Apr 20, 2019 08:42होमपेज › Sangli › साहित्य संमेलने ‘सणां’ सारखी व्हावीत

साहित्य संमेलने ‘सणां’ सारखी व्हावीत

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:32PM

बुकमार्क करा

लिंगनूर : वार्ताहर

शहरासह खेडोपाडी सामाजिक आणि संस्कृतीचे ज्ञान देणारी  साहित्य संमेलने सण म्हणून साजरे करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बेळंकी  येथील इरादा युवा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा विसर पडत असल्याने साहित्य संमेलने सण म्हणून साजरे करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

बेळंकी  येथे  इरादा सामाजिक संस्थेच्यावतीने  चौथे इरादा युवा साहित्य संमेलन उत्साहात पार झाले.  यावेळी ग्रंथ दिंडी निघाली. संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे  अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आज युवक फेसबुक, इंटरनेटच्या अतिवापरामुळे दिशाहीन बनत आहे. युवकांनी  संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचे भान राखले पाहिजे.

कवी प्रदीप पाटील म्हणाले,  आताच्या काळात सामाजिक उदासीनता अस्वस्थ करणारी आहे.   ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन म्हणाले, सामाजिक, आर्थिक, राजकीय आदी विविध  क्षेत्रांमध्ये देश-परदेशात प्रगती साधण्यासाठी युवकांमध्ये चांगले ज्ञान, कष्ट आणि जिद्द  गरजेची आहे. अमेरिकेत नोकरी करणारे इरादा संस्थेचे संस्थापक सदस्य विनोद कांबळे, नायब तहसीलदार मदन जाधव यांचा नामोल्लेख करत महाजन म्हणाले,  ग्रामीण युवकांनी अशा अधिकार्‍यांचा आदर्श ठेवावा. यावेळी  गटविकास अधिकारी राहुल रोकडे उपस्थित होते. राजेश चव्हाण, उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभागीय लेखा परीक्षक रणजीत झपाटे यांनी  मार्गदर्शन केले. यावेळी  पुरस्कारप्राप्त मान्यवर, आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कविसंमेलनामध्ये  दयासागर बन्ने, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे, सौ. मनीषा पाटील, वर्षा चौगुले, किशोर वाघमारे आदींनी  कविता सादर केल्या.  कथाकार जयवंत आवटे यांनी विनोदी कथा सादर केली.  शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, जि. प. सदस्या जयश्री पाटील, सुवर्णा कोरे, वसंतराव गायकवाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, मदन जाधव, नामदेव भोसले उपस्थित  होते.