Fri, Feb 22, 2019 06:01होमपेज › Sangli › पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात एल्गार

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात एल्गार

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 05 2018 12:27AMइस्लामपूर : वार्ताहर

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर भव्य युवा एल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली नाही; तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा मोर्चेकर्‍यांनी यावेळी दिला.

दरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी म्हणून सायकल आणली होती. ती त्यांनी तहसीलदारांकडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फक्त निवेदन स्वीकारले.येथील तहसील कार्यालय चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयात आला. तेथे मोर्चासमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची भाषणे झाली. मागणीचे निवेदन तहसीलदार नागेश पाटील यांना देण्यात आले. 

तालुकाध्यक्ष विजय पाटील ,शहर अध्यक्ष शहाजीबापू पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील,नगरसेवक खंडेराव जाधव , युवकचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील,महिला जिल्हाध्यक्षा छाया पाटील, तालुकाध्यक्ष सुश्मिता जाधव, जुबेर खाटीक यांची भाषणे झाली.

या मोर्चात मोटारसायकलची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. बैलगाडीतून पेट्रोल पंपाची प्रतिकृती तसेच सायकल व मोटारसायकल यांचीही मिरवणूक काढण्यात आली.  सभापती सचिन हुलवान, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, नगरसेवक अ‍ॅड. विश्‍वास डांगे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. विश्‍वास पाटील,  माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, भगवान पाटील,  आनंदराव पाटील, हमीद लांडगे आदिंसह पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी मोर्चाचे संयोजन केले.