Sun, Jul 05, 2020 22:46होमपेज › Sangli › पाणी योजना सुरू न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही

पाणी योजना सुरू न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:57PM

बुकमार्क करा

कडेगाव : शहर प्रतिनधी

ताकारी आणि टेंभू पाणी  योजनांचे  आवर्तन आठ दिवसांत सुरू करावे अन्यथा जिल्ह्यात भाजपच्या एकाही मंत्र्यांला फिरू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वजित कदम यांनी दिला.

 येथे ताकारी-टेंभू योजेनांचे आवर्तन तातडीने सुरू करावे, वाढीव पाणीपट्टी रद्द करावी आणि दोन्ही योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत या  मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी  डॉ.विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली  शेतकर्‍यांचा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. कदम म्हणाले की,दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या ताकारी-टेंभू या सिंचन योजनांबाबत राज्य शासनाची भूमिका दुटप्पी  आहे.  त्यामुळे पिके वाळू लागली आहेत. तातडीने पाणी सुरू करावे.दुष्काळी  कडेगावला पाणी मिळावे म्हणून  आमदार डॉ.पतंगराव कदम यांनी सतत प्रयत्न केले. या योजना पूर्ण व्हाव्यात म्हणून विधानसभेत प्रत्येक वेळा आवाज उठवून पाठपुरावा केला.आघाडी सरकारच्या काळात सिंचन योजना पूर्ण व्हाव्यात म्हणून निधीची तरतूद केली.टंचाई निधीतून  वीजबिले भरून  योजना सुरू ठेवल्या.परंतु भाजपच्या राज्यात योजना बंद आहेत.

ते म्हणाले,  सोनहिरा आणि उदगिरी साखर कारखान्यांकडून  शेतकर्‍यांची वसूल केलेली पाणीपट्टी लगेच दुसर्‍या दिवशी भरली जाते.या दोन्ही कारखान्यांनी पाणीपट्टी भरली आहे.अद्याप कारखान्यांची अडीच कोटी रक्कम  थकित आहे.त्यांच्याकडून पैसे वसूल करा.

जुन्या बस स्थानकापासून मोर्चाला प्रारंभ झाला. ताकारी व टेंभू योजनांच्या लाभक्षेत्रातील हजारो शेतकरी  मोर्चात सहभागी झाले होते.शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.  मोर्चा तहसीलदार  कार्यालयावर पोहोचल्यावर सभा झाली. विजय शिंदे, संजय जाधव ,शिवाजी पवार, भीमराव मोहिते या  शेतकर्‍यांची आक्रमक  भाषणे  झाली.    

सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ.जितेश कदम ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव , सुरेश निर्मळ ,गुलाम पाटील, उपनगराध्यक्ष साजिद पाटील , लाभक्षेत्रातील हजारो शेतकरी उपस्थित होते .