Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Sangli › सांगली : कुपवाडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून 

सांगलीमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून

Published On: Feb 23 2018 1:14PM | Last Updated: Feb 23 2018 2:24PMकुपवाड : वार्ताहर 

सांगलीतील कुपवाडमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून तरूणाचा खून करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. सागर भीमराव माळी (वय, 30, रा.कापसे प्लॉट, कुपवाड) असे खून झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी रमेश सिद्राम सूर्यवंशी(वय, ४६, रा. कापसे प्लॉट, कुपवाड) अशी संशयितांची नावे आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, मृत सागर माळी व संशयित रमेश सूर्यवंशी हे दोघेही शहरातील कापसे प्लॉटमध्ये शेजारी शेजारीच रहात होते. हे दोघेही ड्रायव्हरचे काम करतात. मृत माळी याचे संशयित सूर्यवंशी याच्या पत्नीबरोबर गेल्या अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना होता. या संबंधातून माळी व सूर्यवंशी यांच्यात वादावादी झाली होती. 

शहरातील काही नागरिकांनी या दोघातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली होती. परंतु, त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले होते. मागील आठवड्यात संशयित सूर्यवंशी याने पत्नी घरातून गायब झाल्याची फिर्याद कुपवाड पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांनी मृत माळी व बेपत्‍ता पत्नीचा शोध घेतला. त्‍यांना माळी कोल्हापूर जिल्ह्यात मिळून आला. 

सुर्यवंशी याच्यासह साथीदारांनी गुरूवारी रात्री माळीला ताब्यात  घेऊन कुपवाड शहरात गाठले. त्याला शहराच्या बाहेर मिरजेच्या बाजूला बडेपीर दर्गा परिसरात नेऊन मारहाण केली. या मारहाणीत माळीचा मृत्यू झाला. त्यानंतर सुर्यवंशीसह साथीदारांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने संबंधित मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीच्या पुलावरून नदीत फेकून दिला. 

या घटनेनंतर सूर्यवंशी हा स्वतः कुपवाड पोलिसात शुक्रवारी सकाळी हजर झाला. त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबूली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलून या प्रकरणात सहभागी असलेल्या सुर्यवंशीच्या अन्य तीन साथीदारांना ताब्यात घेतले.