Fri, Jul 19, 2019 19:48होमपेज › Sangli › यशवंतरावांचे स्मारक होणार तरी कधी?

यशवंतरावांचे स्मारक होणार तरी कधी?

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 8:38PM

बुकमार्क करा

देवराष्ट्रे : विठ्ठल भोसले

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार (स्व.) यशवंतरावजी चव्हाण यांच्या देवराष्ट्रे ( ता. कडेगाव) येथील बहुचर्चित स्मारकाचा प्रश्‍न प्रशासनाचे दुर्लक्ष आणि राज्य पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा यामुळे रेंगाळत पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून निधी उपलब्ध असूनही प्रशासनाकडून पुढचे पाऊल पडलेले नाही. 

राज्य पुरातत्व विभागाच्या ताब्यात असणारे हे स्मारक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला देखभालीसाठी देण्यात आले आहे. महसूल विभागाने मंजूर 2 कोटी 17 लाखांचा निधी पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राज्य पुरातत्व विभागाने स्मारकाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जन्मघर स्मारकाला मूर्त स्वरूप कधी प्राप्त होणार, असा प्रश्‍न यशंवतप्रेमी विचारत  आहेत.

यशवंतरावांच्या जन्मस्थळ 

स्मारकाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून नेत्यांच्या आश्‍वासनानंतरही रेंगाळत पडला होता. मात्र यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने शासनाने त्यांचे जन्मगाव देशातील आदर्श गाव करण्याचा संकल्प केला.  त्याचवेळी त्यांच्या  जन्मस्थळाशेजारी बहुउद्देशीय स्मारक उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी 2 कोटी 17 लाखांचा आराखडा तयार केला. आराखड्याच्या प्रतीही गावात वाटण्यात आल्या. मात्र जन्मशताब्दी वर्षात याबाबत काही हालचाल झाली नाही. त्यानंतर आता दोन वर्षे संपली तरीही स्मारकाबाबत कोणत्याही ठोस हालचाली आजपर्यंत झालेल्या दिसत नाहीत.

देवराष्ट्रे येथील सि.स.नंबर 525 मधील जन्मघर हे सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाने दि. 8 फेब्रुवारी 2000 रोजी ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित केले. त्यानंतर पुरातत्व विभागाने मोडकळीस आलेल्या या जन्मघराची 65 हजार  रुपये खर्चून तात्पुरती डागडुजी  केली. मात्र याबाबत पुन्हा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर शासनाने जन्मघराची दुरुस्ती करण्यासाठी 10 लाख 50 हजारांचा निधी मंजूर केला. त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा बांधकाम करुन घरास पूर्वीची अवस्था प्राप्त करून दिली.

जन्मशताब्दी वर्षात गाव आदर्शवत करण्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी दिला. त्यातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र  यशवंतराव यांचे जन्मघर बहुद्देेशीय स्मारकाच्या कामाचा अजून प्रारंभही  झालेला नाही.

महसूल विभागाने या घराशेजारील नागरिकांच्या जागा 

स्मारकासाठी घेण्यासाठी तत्कालीन  तहसीलदारांच्या उपस्थितीत काही बैठकाही घेतल्या होत्या. मात्र  दरम्यानच्या काळात 2 कोटी 17 लाखांचा निधी पुरातत्व विभागाकडे वर्ग केला गेला आहे. त्यामुळे आता स्मारकाचे काम कोण करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुरातत्व विभागाच्या ताब्यात असणार्‍या या स्मारकाकडे खुद्द या खात्याचेही दुर्लक्ष आहे. आता हे स्मारक ‘महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजने’ अंतर्गत शासनाने प्रतिष्ठानकडे देखभालीसाठी दिले आहे. मात्र  महसूल विभागाने राज्य पुरातत्व विभागाला दिलेल्या निधीचे काय झाले, असा प्रश्‍न आता ग्रामस्थ विचारित आहेत. स्मारकाचे काम व्हावे यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र त्याची दखल शासनाने घेतली नाही.