Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Sangli › ४१० बुब्बुळांचे संकलन ; १९१ लोकांना मिळाली दृष्टी

जागतिक नेत्रदान दिन : जिल्ह्यात सहाशे अंध प्रतीक्षेत

Published On: Jun 10 2018 1:50AM | Last Updated: Jun 09 2018 8:21PMसांगली : शशिकांत शिंदे 

नेत्रदानाबाबतीत सर्वत्र जोरदार जनजागृती करण्यात येत आहे. सरकार त्यासाठी लाखोंचा खर्च करत आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत हजारो लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला असला तरी आजदेखील सांगली जिल्ह्यात 600 अंध व्यक्ती बुब्बुळांच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 410 लोकांचे नेत्रदान करण्यात आले. त्यातून 191 अंधांना नवी दृष्टी मिळाली. जगात 45 दशलक्ष अंध आहेत  पैकी  15 दशलक्ष अंध हे एकट्या भारतात आहेत. भारतासह जगभरात असंख्य देशांमध्ये गरिबी, पोषण आहार न मिळणे, अपघात, आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर शस्त्रक्रियेने नवीन दृष्टीपटल बसवून दृष्टी परत देता येते. मात्र त्यासाठी  नेत्रदानाची आवश्यकता आहे.  

यासाठीच नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन जगभरात प्रतिवर्ष 10 जून हा दिवस ‘जागतिक नेत्रदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. नेत्रदान दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांनी  नेत्रदान करावे यासाठी जनजागृती करण्यात येते. लोकसंख्येच्या तुलनेत  भारतामध्ये नेत्रदानाची संख्या ही कमी आहे. याउलट श्रीलंका सारख्या लहान देशात बुब्बुळांची निर्यात केली जाते.  

जिल्ह्यात नेत्रदान मोहिमेबाबत  शासकीय पातळीवर उदासीनता दिसते. सरकारने जिल्ह्याला 500 नेत्रदानांचे ‘लक्ष्य’ दिले आहे. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न ‘सिव्हिल’कडून कसाबसा केला जातो. प्रत्येकवर्षी नेत्रदान करणारे हजारो अर्ज भरून दिले जातात. प्रत्यक्षात नेत्रदानांची संख्या वाढताना दिसत नाही. जिल्ह्यात 9 ठिकाणी आय बँक आहेत. वर्षभरात  त्या ठिकाणी 410 जणांचे नेत्रदान झाले. यातून  191 बुब्बुळांचा लाभ झाल्याने त्यांना हे जग पाहता आले.आपल्या देशातील कायद्यानुसार नेत्रदान हे मरणोत्तर करावे असे असले तरी, वयाचे एक वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती हा नेत्रदान करू शकतो. 

हे नेत्रदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही करू शकतात. आपल्या मृत्यूपत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाईकांना कल्पना देऊन नेत्रदान केल्यास ते डोळे पुढे कोणाच्यातरी उपयोगी पडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या मृतदेहाची जबाबदारी ही त्या व्यक्तीच्या वारसदाराची असते. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी दिली नाहीतर नेत्रदान होऊ शकत नाही. तसेच मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केले जाऊ शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहरलेले हे निसर्गरम्य आणि नयनरम्य जग बघता येऊ शकते. त्यामुळेच नेत्रज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे.

देशात साधारण दृष्टीदोषाने 27 दशलक्ष व्यक्ती ग्रासित आहेत. दोन्ही डोळ्यांचे अंधत्व 9 दशलक्ष लोकांना असून 3 दशलक्ष अंध बालके आहेत. बाहुलीचा पडदा खराब असणार्‍या अंध व्यक्तींची संख्या 4.60 दशलक्ष आहे. बाहुलीच्या पडदा रोपणामुळे जवळपास 3 दशलक्ष लोकांना लाभ झाला आहे. यातून नेत्रदानाचे महत्व लक्षात येण्यास हरकत राहणार नाही.

नेत्रदान करण्यासाठी ही काळजी घ्या...

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जास्तीत जास्त 6 तासामध्ये मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बँकेत जमा होतील, असे पहावे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा. पंखा बंद ठेवावा. सुक्ष्म जंतुनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टाकावे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.  मृत व्यक्तीचे डोके अंदाजे 6 इंच वर उचलून ठेवावे. असे केल्याने डोळे काढताना रक्तस्त्राव टाळता येईल. 

नेत्रदानाबाबत चुकीच्या समजुती :  डॉ. किल्लेदार

नेत्र रोपण करताना संपूर्ण डोळ्याचे रोपण होत नसून फक्त डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण होते. उर्वरित भागाचा वापर शैक्षणिक आणि संशोधनासाठी केला जातो. नेत्रदानाबाबतच्या चुकीच्या समजुती दूर व्हायला हव्यात. आमच्या अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये 27 लोकांना नेत्ररोपण करण्यात आले. त्यामुळे 20 लोकांना दृष्टी मिळाली. 8 लोकांचे डोळे वाचले.  मृत व्यक्तीचे डोळे काढून घेणे ही क्रिया फक्त 30 मिनिटांची असून डोळे काढल्यानंतर कोणतीही खूण दिसत नाही, असे डॉ. मिलिंद किल्लेदार यांनी सांगितले.