Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Sangli › मजूर सोसायट्यांना कामाची मर्यादा ३० लाखांपर्यंत

मजूर सोसायट्यांना कामाची मर्यादा ३० लाखांपर्यंत

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 02 2018 11:59PMसांगली : प्रतिनिधी

मजूर सहकारी सोसायट्यांसाठी ई-निविदा मर्यादा 7.50 लाखावरून 15 लाख व 15 लाखावरून 30 लाख रुपये वाढविण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. राज्यात मजूर सहकारी सोसायट्यांना चारपट अधिक कामे मिळतील. हा महत्वपूर्ण निर्णय आहे, अशी माहिती मजूर सोसायट्या फेडरेशनचे नेते व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार प्रविण दरेकर, सीमाताई हिरे, प्रसाद लाड, पृथ्वीराज देशमुख, मजूर सोसायट्या फेडरेशनचे सतीश देशमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. 

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्णय

ई-निविदेतील कामाचे वाटप 33:33:34 या प्रमाणामध्येच करावे. 33 टक्के कामे मजूर सहकारी सोसायट्यांसाठी राखीव राहतील आणि  कामाची संख्या विचारात न घेता कामांची किंमत विचारात घेण्यात यावी. एका मजूर संस्थेस वाटप करावयाच्या एका कामाची कमाल मर्यादा ‘अ’ वर्गाकरीता 15 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये व ‘ब’ वर्गाकरिता 7.50 लाख ऐवजी 15 लाख करावी, मजूर  संस्थांना कामांची मर्यादा 50 लाख रुपयांवरून 1 कोटी करावी. तीन लाख रुपयांच्या आतील कामे सोसायटीस विनानिविदा देण्यात यावीत.  दि. 11 जानेवारी 2000 अन्वये विद्युत, यांत्रिकी मजूर संस्थांना देण्यात येणार्‍या 25 हजारपर्यंतच्या कामांची मर्यादा 50 हजार रुपये करण्यात यावे असा निर्णय झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली.  

150 कोटींची कामे मजूर सोसायट्यांच्या वाट्याला

सांगली जिल्ह्यात 453 मजूर सहकारी सोसायट्या आहेत. यामध्ये ‘अ’ वर्ग 368 व ‘ब’ वर्ग 85 आहेत. मजूर सोसायट्यांसाठी  ई-निविदा मर्यादा वाढविल्याने 4 पट अधिक कामे मिळणार आहेत. वार्षिक सुमारे 150 कोटींपर्यंतची कामे मजूर सहकारी सोसायट्यांच्या वाट्याला येतील, अशी माहिती मजूर सोसायट्या फेडरेशनचे नेते संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.