Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Sangli › महिलादिनी जागर नारीशक्तीचा!

महिलादिनी जागर नारीशक्तीचा!

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 8:37PMसांगली : प्रतिनिधी

जागतिक महिलादिन गुरूवारी जिल्हा परिषदेत विविध उपक्रमांनी साजरा झाला. अस्मिता योजनेंतर्गत शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटपचा प्रारंभ झाला. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत एक व दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतलेल्या दांपत्यांचा सत्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या महिलांचा सत्कार यासह विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. 

जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. महिला व बालकल्याण सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि, बांधकाम व अर्थ सभापती अरूण राजमाने, समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, सदस्या आशाराणी पाटील, सुरेखा जाधव, प्राजक्ता कोरे, अश्‍विनी पाटील, सुरेखा आडमुठे तसेच महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमांची रेलचेल

कन्या कल्याण योजना व माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत एक व दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतलेल्या दांपत्यांचा सत्कार, अस्मिता योजनेंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन वाटप प्रारंभ, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन अंतर्गत ‘वेंडिंग मशीन’चे उद्घाटन, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या महिलांचा सत्कार, डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार वितरण, फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार, ‘विट’मार्फत महिला कर्मचार्‍यांसाठी कॅन्सरविषयक रोग निदान शिबिर, उत्कृष्ट काम केलेल्या आशा कार्यकर्तींचा सत्कार, कुटुंब कल्याण व स्वच्छ सर्र्वेेक्षण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार, स्वच्छ, सुंदर, हरित आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार आदी भरगच्च कार्यक्रम झाला. 

ग्रामीण भागातील महिला व 11 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकीनचा वापर व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती तसेच त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याच्या अस्मिता योजनेचा प्रारंभ झाला. 

आपले सरकार सेवा केंद्राद्वारे मुलींची नोेंद अस्मिता योजनेत केली जाणार आहे. नोंदणी झालेल्या मुलींना अस्मिता कार्ड वाटप केले जाणार आहे. महिला बचत गटामार्फत मुलींना 5 रुपयात तर महिलांना 24 व 29 रुपयात सॅनिटरी नॅपकीन (8 पॅड) उपलब्ध केले जाणार आहेत. 

संग्रामसिंग देशमुख म्हणाले, किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीनसाठी स्विय निधीतून तरतूद करणारी सांगली ही पहिली जिल्हा परिषद आहे. महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी केंद्र, राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. महिला सक्षमीकरणाची चळवळ नेटाने राबविली जाईल. 

प्रा. डॉ. नायकवडी म्हणाल्या, ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ राबविली जात आहे. शून्य व्याज दराने महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. कन्या कल्याण, बेटी बचाव योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषदेतर्फे गौरव केला जाईल. तम्मनगौडा रवि म्हणाले, महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. शिक्षण व आरोग्य विभागामार्फत मुली, युवती व महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातील. 

सीईओ राऊत म्हणाले, विविध योजना, अभियाने लोकांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, एएनएम या महिला कर्मचार्‍यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा परिषदेचा जाणीव जागृती कार्यक्रम 1.70 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहे. 

प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी केले. स्वागत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी केले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी मानले.