Sun, Mar 24, 2019 22:54
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › महिला पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना आष्ट्यात अटक

महिला पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना आष्ट्यात अटक

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 12:11AMआष्टा : प्रतिनिधी

आष्टा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक तेजश्री धनाजी पवार (वय 29, मूळ रा. माजगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)  यांना 15 हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.पवार यांना मदत करणार्‍या नोमान फिरोज वठारे (रा. बागणी, ता. वाळवा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील तक्रारदार यांचा मावसभाऊ व त्याच्या मित्रावर आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ते दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास तेजश्री पवार यांच्याकडे आहे. पवार यांनी तक्रारदाराच्या मावसभावास तपासात मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यामुळे तक्रारदारांनी दि. 27 जून रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  धाव घेतली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी  तक्रारीची शहानिशा केल्यानंतर  सापळा रचण्यात आला. 30 हजारांपैकी 15 हजार रुपये रोख व उरलेले नंतर, असे म्हणून लाच रक्‍कम स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पवार यांचा मदतनीस नोमाज वठारे याच्याविरुद्धही आष्टा पोलिस ठाण्यात  लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र तेंडुलकर व पोलिस  चंद्रकांत गायकवाड, सुनील राऊत, अविनाश सागर व  सारिका कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.