Sat, Nov 17, 2018 14:13



होमपेज › Sangli › महिलेची दोन मुलांसह विहिरीमध्ये आत्महत्या

महिलेची दोन मुलांसह विहिरीमध्ये आत्महत्या

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 1:01AM

बुकमार्क करा





लिंगनूर : वार्ताहर

लिंगनूर (ता. मिरज) येथे दक्षिण बाजूस असलेल्या बसरकुडी भागातील विवाहिता लक्ष्मीबाई मारुती नाईक (वय 30) हिने आपल्या  दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडली. चार वर्षांचा सोहम आणि पाच महिन्यांचा लक्ष्मण यांचे मृतदेह मंगळवारी दुपारी विहिरीवर तरंगताना दिसल्याने घटना उघडकीस  आली. 

विहिरीजवळून जाणार्‍या शेजारच्या लोकांना घटना कळली; पण त्यावेळी  लक्ष्मीबाई यांचा मृतदेह वर आला नव्हता. तो विहिरीतच होता.  नंतर तिचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसपाटील मल्लय्या स्वामी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. लक्ष्मीबाईने आज पहाटे अथवा सोमवारी रात्री मुलांसमवेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत होता. लक्ष्मीबाई ह्या घरकाम आणि  शेतमजुरी करीत होत्या. त्यांचे पती मारुती हे ऊसतोड करण्यास गेले होते. हा प्रकार समजल्यानंतर पतीही घटनास्थळी आले होते. नाईक यांच्या घरी वृद्ध सासू असून, आर्थिक  परिस्थिती बेताची आहे. आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.