होमपेज › Sangli › भाजप महापालिकेत ओढूनताणून १८ च्या आतच

भाजप महापालिकेत ओढूनताणून १८ च्या आतच

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 10:50PMसांगली ः प्रतिनिधी

सांगली महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे संख्याबळ 18 च्या वर जाणार नाही. ओढून ताणून कितीही पक्षप्रवेश घडून आणले तरी भाजप 18 च्या आतच राहणार आहे, असे भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरूवारी सांगलीत राष्ट्रवादीच्या बैठकीत केले. पक्ष बदलूंना मतदार जागा दाखवतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

आमदार सुमनताई पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, इलियास नायकवडी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे, मनोज शिंदे, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शरद लाड, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, आनंदराव पाटील,  हणमंतराव देशमुख,   प्रा. दादासाहेब ढेरे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष (शहर) संजय बजाज, कमलाकर पाटील, ताजुद्दीन तांबोळी, मनोज भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते. 

स्वच्छ कारभार माहिती असल्याने   ‘त्यांना’ थांबविले नाही : पाटील

आमदार पाटील म्हणाले, कालपरवा भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा एक ‘भव्यदिव्य’   कार्यक्रम झाला. या पक्ष बदलूंविषयी मिरजकरांना आत्मीयता नाही. भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेल्यांचा पारदर्शी व स्वच्छ कारभार सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. कुणीही गेले तरी फार फरक पडणार नाही. महापालिकेतील मतदार ‘राष्ट्रवादी-काँग्रेस’ आघाडीच्या मागे भक्कमपणे उभे राहतील. 

त्या 9 मध्ये 1 आपलाही 

मिरजेतील आजी-माजी 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा विषय  जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर ‘त्या’ 9 जणांमध्ये आपला कुणी नाही, असे शहर राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकार्‍यांनी सांगितले. त्यावर पाटील म्हणाले, आपलाही एकजण गेला आहे. नगरसेविकेने पक्ष प्रवेश केला नसला तरी नगरसेवक पतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहेच की. खरे बोलले पाहिजे.   पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीचे प्रयत्न आहेत. दोन्ही पक्षांची आघाडी होईल. ग्रामीण भागातून सांगली महापालिका क्षेत्रात स्थायिक झालेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी महापालिका क्षेत्रातील पै-पाहुण्यांशी संपर्क ठेवून निवडणुकीत मदत करावी.  बुथ कमिट्यांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला.

जयंत पाटील म्हणाले, दि. 15 ते 20 जुलैपर्यंत बुथ कमिट्या स्थापन झाल्या पाहिजेत. बुथ कमिटीचे कार्यकर्ते हे मोबाईल अ‍ॅपद्वारे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष व  पक्षाचे नेते शरद पवार यांच्या थेट संपर्कात येणार आहेत. उमेदवार निवडीतही त्यांच्या मताला महत्व राहणार आहे. ऑगस्टमध्ये राज्यात विधानसभा मतदारसंघनिहाय बुथ कमिटी कार्यकर्त्यांचे शिबीर होईल. पक्षाचे ध्येयधोरण, भाजप-शिवसेना सरकारचे  अपयश यावर बुथ कमिटी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे.