Mon, Apr 22, 2019 04:27होमपेज › Sangli › निधी अडवून भाजपने शहरावर सूड उगविला

निधी अडवून भाजपने शहरावर सूड उगविला

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

केंद्र, राज्यात सत्ता आहे. मात्र महापालिकेत सत्ता नाही. त्यामुळेच भाजपने विकासनिधी अडवून शहरावर सूड उगविला, असा आरोप काँग्रेसनेत्यांनी नेमिनाथनगर येथे बुधवारी जनसंपर्क अभियानात केला. आता आम्ही विकास करू असे सांगत आलेल्या भाजपला थारा देऊ नका, असे आवाहन काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवानेते विशाल पाटील यांनी केले. उपस्थित नागरिकांनी भागातील विकासकामे रखडल्याबद्दल तक्रारी केल्या. अनेकांनी उमेदवारीत फेरबदलाची मागणी केली. यावर जुन्या-नव्यांचा मेळ घालू, असेही आश्‍वासन त्यांनी दिले.

जयश्री पाटील म्हणाल्या, मागील वेळी मदनभाऊंनी चर्चेनेच उमेदवार दिला होता.  त्यानुसार जनतेनेही साथ दिली. काही कामे झाली नाहीत, नगरसेवकांबद्दल तक्रारीही ऐकल्या. पण शासनाकडून निधीची अडवणूक झाल्याने तेही हतबल होते. तरीही त्यांच्या तक्रारींचा विचार करू. चांगले काम करतील असेच उमेदवार देऊ.पृथ्वीराज पाटील म्हणाले, महापालिकेच्या गेल्या पाच वर्षांतील विकासकामांचा आरसा जनतेसमोर आहे. सांगली, मिरजेला 70 एमएलडीच्या माध्यमातून मुबलक व शुद्ध पाणी मिळत आहे. रस्ते चकाचक् आहेत. ड्रेनेज योजनेचीही कामे सुरू आहेत. उलट भाजपने साडेतीन वर्षांत काय दिले, याचा विचारही करावा. .विशाल पाटील म्हणाले, विश्रामबाग, नेमिनाथनगरचा हा प्रभाग काँग्रेस आणि शहराचेही नाक आहे.

आतापर्यंत काँग्रेसलाच येथून साथ मिळाली. पण मागील विधानसभेला मदनभाऊंना, लोकसभेला प्रतिक पाटील यांना येथून मताधिक्य देऊ शकलो नाही. यामागे जनतेतून नाराजी आहे हे मान्य करावे लागेल. अशी नाराजी धोक्याचीच घंटा आहे. यामुळे नवीन चेहरे देण्याबाबत विचार करूच. पण जे टगे आमच्यात होते ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांना रोखण्यात, केंद्र, राज्यातून आणण्यासाठी जुन्यांचीही गरज आहे. तसे तुमच्या पात्रतेत बसणारे योग्य उमेदवार निवडूनच देऊ. बिपीन कदम यांनी प्रास्ताविक केले.