Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Sangli › भाजपचे सत्तेचे दिवास्वप्नच ठरेल

भाजपचे सत्तेचे दिवास्वप्नच ठरेल

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:32AMसांगली : प्रतिनिधी

बहुसदस्यीय प्रभागरचना करून राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा सांगलीतील प्रयोग फोल ठरणार आहे. त्यामुळे महापालिकेचे सत्तेचे त्यांचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार आहे, असा दावा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला. ते म्हणाले, भाजपच्या हस्तक्षेपाने झालेली प्रभागरचना काँग्रेसच्याच पथ्यावर पडली आहे.  विकासकामांच्या जोरावर काँग्रेसला या निवडणुकीत बहुमत मिळेल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.

महापालिकेची प्रभाग रचना व आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. याबाबत पाटील, महापौर हारूण शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनी पत्रकार बैठक घेतली. पाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना केली आहे. भाजपच्या सत्तेच्या अनेक हातखंड्यापैकी हा एक होता. बहुसंख्य प्रभागरचनेतून धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी व्हावी हा छुपा हेतू ठेवला होता. त्यानुसार चार सदस्यीय प्रभाग सांगलीसारख्या लहानशा शहरातही केले. मात्र सांगलीत यांचा डाव फसला आहे. निवडणुकीसाठी झालेली ही प्रभाग रचना व आरक्षण सोडत काँग्रेससाठी 80 टक्के फायदेशीर झाली आहे. 

ते म्हणाले, आम्ही या सर्वाचा अंदाज लक्षात घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी लवकरच नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस विकासकामांच्या जोरावर महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकवेल. आघाडीबाबत विचारता ते म्हणाले, राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाईल. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. यावेळी नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, पांडुरंग भिसे, शेवंता वाघमारे उपस्थित होते. 

Tags : Sangli, Sangli News, development work, Congress,  get majority, in this election