होमपेज › Sangli › सांगलीः साखरेचे दर घसरल्याने उसाचा पहिला हप्ता 2500 रुपये             

सांगलीः साखरेचे दर घसरल्याने उसाचा पहिला हप्ता 2500 रुपये             

Published On: Feb 03 2018 5:50PM | Last Updated: Feb 03 2018 5:50PMसांगली : प्रतिनिधी                                                                                                                     

साखरेचे दर घसरल्याने उसाचा पहिला हप्ता प्रती टन 2500 रुपये सध्या देण्याचा व ठरल्या प्रमाणे एफआरपीची बाकी रक्कम नंतर देण्याचा निर्णय जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत आज घेण्यात आला. या  बैठकीस सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, केन अ‍ॅग्रोचे प्रमुख व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमूख, राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपती सगरे, हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, वसंतदादा कारखाना चालवण्यास घेतलेल्या दत्त इंडियाचे मृत्यूंजय शिंदे, विश्‍वास कारखान्याचे राम पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते.                                                                                 

दरम्यान शेतकर्‍यांच्या उसाला चांगला दर देण्यासाठी साखर कारखान्यांना सरकारने मदत करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचाही निर्णय ही यावेळी घेतण्यात आला. 
साखरेचे दर सध्या प्रती क्विंटलला 2800रुपयापर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना उसाचे पैसे देण्यासाठी कारखान्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी पहिला हप्ता प्रती टनास 2500 रुपयाचा  निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील कारखानदारांनी  हीच भूमिका जाहीर केली.  

बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. त्यात ते म्हणाले, आपल्या भागातील ऊस हेच मुख्य पैसे मिळवून देणारे पीक आहे. साखरेचे दर घसरल्याने कारखान्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारखाना वाचला तरच शेतकरी वाचणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येऊन 2500 रुपयाचा निर्णय घेतला. कोल्हापूर पेक्षा आपल्या जिल्ह्यातील  उसाचा उतारा कमी आहे. तरी सुद्धा शेतकर्‍यांना कोल्हापूर प्रमाणेच दर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. सोलापूर, सातारा आणि इतर जिल्ह्यातही आपल्या पेक्षा कमी दर आहेत. साखरेचे दर वाढल्यानंतर आणि सरकारकडून मदत मिळाल्यानंतर  बाकीचे पैसेही आम्ही शेतकर्‍यांना नंतर देणार आहोत. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. 

ते म्हणाले, जिल्ह्यात अद्याप 50 टक्के ऊस गाळप झालेला नाही. पुढील वर्षी उसाचे क्षेत्र आणखी वाढलेले असणार आहे. त्यामुळे सरकारने 40 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करुन ठेवणे आवश्यक आहे. इथेनॉईल निर्मितीची प्रत्येक कारखान्यांना सक्ती करण्यात यावी व ते प्रती लिटर 50 रुपये दराने  घेण्यात यावे. ब्राझीलमध्ये आवश्यकते नुसार साखर किंवा इथेनॉईल निर्मिती केली जाते, त्याप्रमाणे आपल्याकडे ही धोरण राबवणे आवश्यक आहे. खाण्यासाठी साखरेचा  दर आणि औद्योगीक कारखान्यातील साखरेचा दर वेगवेगळा असायला हवा आहे.