Tue, Jul 16, 2019 22:15होमपेज › Sangli › शहर विकासाबरोबर पूर्वीच्या गैरकारभाराचीही चौकशी

शहर विकासाबरोबर पूर्वीच्या गैरकारभाराचीही चौकशी

Published On: Aug 28 2018 1:44AM | Last Updated: Aug 27 2018 11:03PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत जनतेने दाखविलेला विश्‍वास सार्थ करीत भाजप पदाधिकारी, नगरसेवक भ्रष्टाचारमुक्‍त व पारदर्शी कारभार करतील. त्याबरोबर गेल्या दहा वर्षांतील गैरव्यवहारांची चौकशी करून  दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा करू, असे खासदार संजय पाटील पत्रकार बैठकीत सांगितले. शुद्ध पाणी, स्वच्छता, दर्जेदार रस्ते अशा मूलभूत सुविधांपासूनच भाजप शहर विकासाची सुरुवात करेल, असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

महापौर सौ. संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी व गटनेते युवराज बावडेकर यांनी जल्लोषी मिरवणुकीने सोमवारी सुत्रे स्वीकारली.त्यावेळी ते बोलत होते.  अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भगवानराव साळुंखे, शेखर इनामदार, नीता केळकर, अ‍ॅड. स्वरदा केळकर-बापट, सुरेश आवटी, श्रीकांत शिंदे  उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने महापालिकेत भ्रष्ट कारभार केला. कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही विकासाचा खेळखंडोबा करीत शहराचे वाटोळे केले. त्यामुळे या भ्रष्ट कारभाराला जनता वैतागली होती. त्याचा हिशेब जनतेने या निवडणुकीत केला. भाजपला बहुमत देऊन शहराच्या विकासाची सूत्रे हाती दिली आहेत. 

ते म्हणाले, महापालिकेत गेल्या दहा वर्षात अनेक घोटाळे झाले आहेत. या सर्व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आमची मागणी आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची हमी दिली आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करू.  

प्रमुख समस्या सोडवू : गाडगीळ

गाडगीळ म्हणाले, भाजपला जनतेने बहुमताने सत्ता दिली आहे. शहरातील खराब रस्ते, अपूर्ण असणारी ड्रेनेज व पाणीपुरवठा योजना पूर्ण करून मूलभूत नागरी सुविधांची अडचण कायमची संपवू. स्वच्छ व सुंदर शहर बनवू. महापालिकेत भ्रष्टाचारमुक्‍त, पारदर्शी आणि विकासाभिमुख कारभार व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. यापुढे महापालिकेच्या कारभारावर शेखर इनामदार यांचा कंट्रोल राहील. त्यांच्याकडे कोअर कमिटीकडेही मनपाची जबाबदारी दिली आहे. 

गैरकारभाराच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटू

उपमहापौर सूर्यवंशी म्हणाले, जनतेने भाजपवर विश्वास टाकून बहुमत दिले आहे. कोअर कमिटी व भाजप नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून उपमहापौरपदाची संधी दिली आहे. हा विश्वास सार्थ करीत आम्ही सर्वजण एकदिलाने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार करू.  यापूर्वीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटू.