Fri, Jun 05, 2020 21:07होमपेज › Sangli › सांगलीतील पोलिसपुत्रासह दोघांवर गुन्हा

सांगलीतील पोलिसपुत्रासह दोघांवर गुन्हा

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 07 2017 12:47AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार तरुणांना टुरिस्ट व्हिसावर मलेशियाला पाठवण्यात आले. मात्र व्हिसाची मुदत संपल्यानंतर चौघाही तरुणांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तसेच वर्किंग व्हिसा न दिल्याने सांगलीतील एका पोलिसपुत्रासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी मध्यरात्री सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार (वसंतनगर, कुपवाड) आणि धीरज पाटील (रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पेठ (ता. वाळवा) येथील नामदेव लक्ष्मण कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. नामदेव कुंभार यांचा मेहुणा गुरुनाथ इरण्णा कुंभार

 हा शिरवळ (ता. अक्कलकोट) येथे राहतो. त्याने कराडमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्यावेळी त्याची कराडमधील एका हॉटेलमध्ये कौस्तुभ पवारशी ओळख झाली. त्यानंतर कौस्तुभने त्याची  धीरज पाटीलशी ओळख करून दिली. 

ओळख वाढल्यानंतर 10 एप्रिल रोजी कौस्तुभने गुरुनाथला फोन करून सांगली बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये बोलविले. त्यावेळी त्याने आपण आतापर्यंत शंभर जणांना मलेशियात नोकरी मिळवून दिल्याचे सांगितले. तसेच गुरुनाथला हॉटेल मॅनेजरची नोकरी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र व्हिसा आणि अन्य खर्चासाठी दीड लाख रूपये भरण्यास सांगितले. 

त्यानंतर गुरुनाथने पेठमधील भाऊजी नामदेव कुंभार यांना याची माहिती दिली. त्यानंतर गुरुनाथ व नामदेव कुंभार यांनी कौस्तुभच्या सांगण्यावरून त्याची सांगलीतील बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यानंतर गुरुनाथसह अशोक शिंदे (रा. बेलवडी, जि. अहमदनगर), दीपक माने (रा. हुन्नर, जि. सोलापूर), सदानंद धनगर (रा. जवळगाव) यांनाही मलेशियात नोकरीसाठी पाठविण्याचे ठरले. 

त्यानंतर गुरुनाथने कौस्तुभच्या बँक खात्यावर 27 जूनला 50 हजार, 27 जुलैला 60 हजार रूपये भरले. त्यानंतर 20 ऑगस्टला चाळीस हजार रूपये रोख सांगलीत दिले. त्यानंतर कौस्तुभने चौघांनाही ओरिसातील तेरूचिलापल्ली येथे पाठविले. तेथून त्यांना विमानाने मलेशियाला पाठविले. तेथे गेल्यानंतर वीस दिवस गुरूनाथ कुटुंबियांशी फोनवरून संपर्क साधत होता. तसेच त्याने अजूनही वर्किंग व्हिसा मिळाला नसल्याचे कुटुंबियांना सांगितले. 

कुंभार कुटुंबियांनी याबाबत फोनवरून कौस्तुभ पवारकडे चौकशी केली. मात्र तो त्यांना उत्तरे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यानंतर दि.13 नोव्हेंबरला कौस्तुभने गुरूनाथसह चौघांना इमिग्रेशन कार्यालयात चौकशीसाठी नेल्याचे फोनवरून सांगितले. तसेच चौकशी करून त्यांना सोडून देतील असे सांगितले. मात्र पोलिसांनी वर्किंग व्हिसा नसल्याने चौघांनाही तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले. 

मुलांशी संपर्क तुटल्याने कुंभार कुटुंबियांनी कौस्तुभकडे चौकशी केली. मात्र तो टाळाटाळ करू लागला. नंतर तर त्याने मोबाईलच बंद करून टाकला. आजअखेर मुलांशी संपर्क न झाल्याने अखेर नामदेव कुंभार यांनी पोलिसपुत्र कौस्तुभ पवारसह धीरज पाटील यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसपुत्र कौस्तुभ भामटा

यातील संशयित कौस्तुभ पवार हा पोलिसाचा पुत्र आहे. त्याचे वडील इस्लामपूर ठाण्यात सहाय्यक फौजदार आहेत. मात्र दोन महिन्यांपासून ते आजारी रजेवर असल्याचे समजते. पोलिसपुत्र असल्याचे सांगत त्याने अनेकांची फसवणूक केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.