Mon, Aug 19, 2019 05:00होमपेज › Sangli › दूषित पाण्यामुळे कापरीत गॅस्ट्रोची साथ

दूषित पाण्यामुळे कापरीत गॅस्ट्रोची साथ

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 10:39PM

बुकमार्क करा

शिराळा : प्रतिनिधी 

कापरी  (ता. शिराळा) येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ सुरू झाली आहे.  किमान चाळीस जणांना लागण झाली आहे.  गटविकास अधिकारी अनिल बागल व वैद्यकीय अधिकारी एम.एन. घड्याळे यांनी गावास भेट दिली. शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. आज येथील शासकीय रुग्णालयात तीन रुग्ण दाखल करण्यात आले. 

गॅस्ट्रोने आजारी असलेले रुग्ण असे : अशोक जाधव (वय 40), जोतीराव पाटील (34), सुवर्णा पाटील ( 42), सुजाता पाटील (30), शांता पाटील (40) ,युवराज पाटील (38), संगीता पवार (32), रुक्मिणी पाटील ( 50) , नरेन्द्र पाटील (23),  नामदेव पाटील (43), बाबासाहेब पाटील (69),  जगन्नाथ पाटील (70), रामराव पाटील (80), सुनील कुंभार (50), कांचन सावंत (55), रुक्मिणी कुंभार (69), अनुराधा पाटील (15), माधुरी पाटील (22), अनुष्का पाटील (7), आयुष पाटील (9), मालन जाधव  (65) आदींना लागण झाली आहे. यापैकी काहींना  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर काहींना उपचार करून घरी पाठवले आहे.  काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या गावाला कूपनलिकेचे पाणी पुरवले जाते. ते जुन्या पाण्याच्या टाकीत सोडून  गावास पुरवले जाते. ही जुनी पाण्याची टाकी पाडण्याचे  आदेश आहेत.  मात्र नवीन टाकी मागणी करूनही मंजूर न झाल्याने  जुनीच टाकी वापरली जाते. संबंधित विभागाकडे नवीन पाण्याची टाकी व विहीर बांधण्याबाबत प्रस्ताव देऊनही अद्याप  कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच पाणी शुद्धीकरणाची व्यवस्थाही नाही. त्यामुळे ही साथ पसरली असावी, असा अंदाज आहे.        

आरोग्य अधिकारी  डॉ.  घड्याळे  साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गावात सर्वेक्षण तसेच मेडिक्लोरचे वाटप सुरू आहे.  दूषित पाणी पुरवठा होईल यासाठी  मेडिक्लोरचे वाटप केले जाते मात्र काही  ग्रामस्थ त्याचा वापर करीत नाहीत. त्यामुळे दूषित पाणी पिले गेले असावे असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. डॉ. अनिरुद्ध काकडे,  डॉ. उत्तम शिंदे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी  साथीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  सरपंच मोहन पाटील,  ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करीतआहेत.