होमपेज › Sangli › महालक्ष्मीसह तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न

महालक्ष्मीसह तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 12:57AMमिरज : प्रतिनिधी

मिरज-पुणे रेल्वे मार्गावर सातारा जिल्ह्यातील सालपे व आदर्की स्थानकात सिग्‍नलची वायर कापून कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनन्स (एलटीटी)-हुबळी एक्स्प्रेस 10 ते 12 दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न रविवारी मध्यरात्री केला. यामध्ये काही प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या आहेत. एकाच दिवशी तीन एक्स्प्रेस गाड्या लुटण्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस व सह्याद्री एक्स्प्रेस सालपे स्थानकाजवळील आऊटर सिग्‍नलची वायर कापून दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबताच काही खिडक्यांमधून आत हात घालून दागिने हिसकाविण्याचाही प्रयत्न केला. एका दरोडेखोराने गाडीतील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. परंतु, ते मंगळसूत्र महिलेच्या गळ्यातून तुटून गाडीतच पडले. 

या गाडीला आरपीएफचा बंदोबस्त असल्याने गाडी थांबताच आरपीएफ जवानांनी प्रवाशांना सावधान करून दरवाजे बंदच ठेवण्याचे आवाहन केले. गाडीतील व स्थानकातील ड्युटीवरील आरपीएफ जवान एम. ए. मोरे आणि राकेश कुमार या दोघांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. दरोडेखोरांनी शेजारील ऊस व बाजरीच्या पिकातून पळ काढला. त्यामुळे दरेडोखोरांचा तीन एक्स्प्रेस गाड्या लुटण्याचा प्रयत्न फसला. या घटनेनंतर सातारा आरपीएफ, मिरज रेल्वे पोलिस, मिरज आरपीएफ आणि लोणंद पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला.

सालपे स्थानकापुढील स्थानक आदर्की येथे लोकमान्य टिळक टर्मिनन्सहून हुबळीकडे निघालेली एक्स्प्रेसही सिग्‍नलची वायर कापून अडविण्यात आली. दरोडेखोरांनी येथेही प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला. या गाडीतील बेळगाव येथील एका प्रवाशास दरोडेखोरांनी लुटले आहे. या गाडीस मात्र कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नसल्याने गाडी किती वेळ थांबली व किती प्रवाशांना लुटले, हे समजू शकले नाही.  बेळगाव येथील त्या प्रवाशाने बेळगाव रेल्वे पोलिसात तक्रार दिल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी सातारा येथील आरपीएफ ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.