Fri, Apr 26, 2019 17:23होमपेज › Sangli › स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणार : मुख्यमंत्री फडणवीस

स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणार : मुख्यमंत्री फडणवीस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिलेल्या निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणखीन बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर येथे केले.राज्यातील पहिला बेघरमुक्‍त जिल्हा करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

येथील प्रकाश शिक्षण संस्थेच्या संकुलात जिल्ह्यातील भाजपचे जि.प., पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे,  नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विक्रमभाऊ पाटील, वैभव शिंदे, माजी आ. भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते. जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. थेट निधी मिळत नसल्याने काम करताना अडचणी येत असल्याची गार्‍हाणी जि.प., पं.स. सदस्यांनी मांडली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने विविध योजनांसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र मंजूर निधी डिपीडीसीच्या माध्यमातून पाहिजे तसा खर्च होत नाही. निधीचे योग्य नियोजन होत नाही. जिल्हा परिषद सदस्यांना पाहिजे तेवढा निधी मिळत नाही, अशा तक्रारी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आहेत. त्यामुळे यापुढे या निधीचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेंना जास्त अधिकार देऊन त्या आणखीन बळकट केल्या जातील.

जि. प. चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना निधी मिळावा, शासकीय कार्यालयातील रिक्‍तपदे भरण्यात यावीत, 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट जि.प. ला मिळावा, जिल्ह्यातील रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी 10 कोटींचा निधी तात्काळ मिळावा, शिक्षक कार्यमुक्‍त करण्याचा अधिकार जि. प. ला मिळावा आदी मागण्या केल्या. या मागण्यावर निश्‍चित सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी भुयारी गटर योजनेस निधी मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. जि.प. चे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आभार मानले.