Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Sangli › रिक्षा, व्हॅनची वाहतूक सुरक्षित होणार का?

रिक्षा, व्हॅनची वाहतूक सुरक्षित होणार का?

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 12:01AMसांगली : प्रतिनिधी

पोलिसांची वाहतूक शाखा आणि आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त मोहिमेत बेकायदा, विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मेमो देऊन वाहने सोडूनही देण्यात आली.  रिक्षा, व्हॅनची धोकादायक वाहतूक  बंद होणार का असा प्रश्‍न आहे. कारवाई झाली पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालाच नाही. या वाहनधारकांकडून सुरू असलेली पालकांची लूटही यानिमित्ताने चर्चेचा विषय बनला आहे. 

आरटीओ कार्यालयाकडील अधिकृत विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसतानाही सांगली, मिरज, तासगाव, विटा, इस्लामपूर यासह ग्रामीण भागात खासगी वाहनांतून सर्रास विद्यार्थी वाहतूक केली जाते. सध्या संयुक्त पथकाने केवळ सांगली, मिरज शहरातील 74 वाहनांवर कारवाई केली आहे. मात्र ग्रामीण भागातही अशाच प्रकारे कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इंधन दरवाढीमुळे त्यांच्याकडूनही दर वाढविले जात आहेत. वाहनांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येवरही कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांना वाहनांमध्ये अक्षरशः कोंबून त्यांची वाहतूक केली जाते. केवळ वर्षांतून एकदा अशी कारवाई करून अशा वाहतुकीला आळा बसणार नाही. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. शिवाय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असलेल्या वाहनांचीही सातत्याने तपासणी करण्याची आवश्यकता आहे.  

नुकतीच कारवाई कऱण्यात आलेल्या वाहनधारकांनी परवान्याची मागणी केली आहे. मात्र त्यांना परवाना देतानाच विद्यार्थी संख्याही ठरवून देण्याची गरज आहे. तरच हे खुराडे बंद होतील.  जिल्ह्यात झालेले विद्यार्थी वाहतूक वाहनांचे अपघात पाहता अशा वाहनांवर याआधीच कारवाई होण्याची गरज होती. मात्र उशीरा का होईना पोलिस, आरटीओ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सातत्य ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ बंद होण्याची शक्यता आहे.