Thu, Apr 25, 2019 21:57होमपेज › Sangli › बनावट नोटांचा धंदा थांबणार तरी कधी ?

बनावट नोटांचा धंदा थांबणार तरी कधी ?

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 11:11PMमिरज : जालिंदर हुलवान

गेल्या अनेक वर्षांपासून बनावट नोटांचा धंदा सुरू आहे. पोलिसांनी अनेकवेळा या नोटा पकडल्या. त्या  छापणार्‍यांना आणि विकणार्‍यांनाही पकडले. पण बनावट नोटा पुन्हा पुन्हा तयार झाल्या आणि त्या पुन्हा पुन्हा खपविल्या गेल्या. आजही हा धंदा सुरूच आहे. एकीकडे शासनाकडे नोटा छपाईचे तंत्रज्ञान विकसित झाले पण दुसरीकडे बनावट नोटा तयार करण्याचेही तंत्रज्ञान आले आहे. बनावट नोटांच्या या भानगडी थांबणार कधी, हा प्रश्‍न सामान्य जनतेतून विचारला जात आहे मिरजेत चार दिवसांपूर्वी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी एका तरूणाला अटक केली. त्याच्याकडे पाचशे रूपयांच्या आणि दोन हजार रूपयांच्या अशा एकूण 21 बनावट नोटा सापडल्या. त्यामुळे पुन्हा मिरजेत खळबळ उडाली. 

सरकारने पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या आणि त्यानंतर नव्या पाचशे रूपयांच्या आणि हजार ऐवजी दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या. नव्या नोटा चलनात आणल्यानंतर सरकारने बनावट नोटा संपतील असा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरला आहे. नोटाबंदी झाल्यानंतर मिरजेत अनेकवेळा बनावट नोटा चलनात सापडल्या. त्यामुळे आता प्रत्येकाने नोट घेताना आणि देताना जागृत राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मिरजेत तरूणाकडे पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा सापडल्या. त्या तरूणाला त्या बनावट नोटा सातार्‍यातील एका तरूणाने खपविण्यासाठी दिल्या होत्या. खपविण्यासाठी त्याने किती नोटा दिल्या होत्या ? सापडण्यापुर्वी त्याने कोणाला खपविल्या असतील का ? हे प्रश्‍न अद्याप निरूत्तरीत आहेत. त्यामुळे मिरजेसह अन्य शहरांमध्ये अशा बनावट नोटा चलनात आल्या असतील अशी भिती निर्माण झाली आहे.

सन 2000 मध्ये मिरज-कर्नाटक सीमा भागातील एका गावात चहाच्या टपरीवर शंभर रूपयांची बनावट नोट खपविण्यासाठी एक महिला आली होती. त्या चहाची टपरी चालविणार्‍याने मिरज ग्रामीण पोलिसांना ही माहिती गुपचूप दिली होती. त्यानंतर पोलिसांनी  एका महिलेला अटक केली होती. त्यावेळी त्या बनावट नोटांचे कनेक्शन हे सातारा जिल्हा होते. त्या महिलेला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी कराड येथून अटक केली होती. त्यांच्याकडून अनेक बनावट नोटा व छपाईचे यंत्र जप्त करण्यात आले होते. 

सन 2006 मध्ये मिरज शहर पोलिसांनीही  एकास अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून 36 लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्याला कर्नाटकातील हुबळी येथून नोटा छापणार्‍याला मशीनसह अटक करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी मिरजेतील एका भेळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या एकाला कर्नाटक पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी अटक केली होती. बनावट नोटा प्रक़रणी शहरात अनेकवेळा कारवाई करण्यात आली होती. अनेकवेळा बनावट नोटा सापडल्याही होत्या. आता पुन्हा या बनावट नोटांची भानगड उघड झाली आहे. मिरजेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्याचा धागा पकडत साताराच्या पोलिसांनी बनावट नोटा छपाई करणारी मशीन व टोळीच पकडली आहे. आता मिरजेत पकडलेल्या दोघांकडून कोणती माहिती पुढे येते ते बघावे लागणार आहे.    

बनावट कॉईन संपले.. आता नोटा 

सन 2006 मध्ये फोन साठी जागोजागी कॉईन बॉक्स आले होते. एक रूपयांचे नाणे त्या बॉक्समध्ये टाकले, की एक मिनिट बोलण्यासाठी फोन लागायचा. त्यावेळी कॉईन बॉक्सच्या मालकांनी दररोज रात्री तो बॉक्स उघडला की त्यामध्ये बनावट कॉईन सापडायचे. त्यानंतर हळू हळू कॉईन बॉक्स हद्दपार झाले आणि आपोआपच बनावट कॉईनही हद्दपार झाले.त्याप्रमाणे या बनावट नोटा  हद्दपार झाल्या पाहिजेत.