Tue, Mar 26, 2019 02:19होमपेज › Sangli › ताकारी, टेंभू योजना केव्हा सुरू होणार?

ताकारी, टेंभू योजना केव्हा सुरू होणार?

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 9:45PM

बुकमार्क करा

कडेगाव : संदीप पाटील

कडेगाव, खानापूर व आटपाडी तालुक्यांना वरदान ठरणार्‍या ताकारी व टेंभू योजना गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे पाण्याअभावी  उभी पिके वाळून चालली आहेत. तालुक्यातील नदीपात्र, बंधारे व विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

ताकारी व टेंभू योजनेचे पाणी तालुक्यात येण्यापूर्वी तालुक्यातील स्थिती अतिशय बिकट  होती. दुष्काळ पाचवीलाच पूजलेला होता. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची तर अतिशय गंभीर अवस्था होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून घाटमाथ्यावर ताकारी व टेंभूचे पाणी आले. तेव्हापासून तालुक्यातील शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ताकारी व टेंभूचे पाणी आल्याने तालुक्यात साखर कारखान्यांची संख्याही वाढली. ऊस क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील कारखानदारांनी ताकारी व टेंभूच्या पोटकालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न केला. 

परंतु सध्या या दोन्ही योजनांचे आवर्तन वीज बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहे. वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. ताकारी योजनेची थकबाकीची रक्कम काही प्रमाणात तालुक्यातील कारखानदारांनी भरली आहे. परंतु अजूनही रक्कम भरणे आवश्यक असल्याने पाणी सोडण्यात  अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे योजनांच्या आवर्तनाबाबत सतत लक्ष असे. पाणी सोडताना अडचणी निर्माण होतील; त्यावेळी पुढाकार घेऊन ते टंचाई निधीतून तरतूद करीत असत. आता मात्र सत्ताधारी मंडळींकडून तशा हालचाली होताना दिसत नाहीत.