Mon, May 27, 2019 08:51होमपेज › Sangli › अपयशी भाजप सांगलीत काय दिवे लावणार?

अपयशी भाजप सांगलीत काय दिवे लावणार?

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:26AM
सांगली : प्रतिनिधी 

मोठी आश्‍वासने दिलेले भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी आहे. जनतेचा अपेक्षाभंग करून केंद्र व राज्यात अपयशी ठरलेले हे सरकार सांगलीत काय दिवे लावणार, असा सवाल  माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, मोदी व फडणवीस  सरकारने दिलेली आश्‍वासने खोटी ठरू लागल्याने लोकांचा भाजपवरील विश्‍वास उडू लागला आहे. कुठे आहेत दोन कोटी रोजगार, कुठे आहेत लाखो कोटींची गुंतवणूक, देशात अथवा राज्यात कुठेतरी एकतरी उद्योग उभा राहून रोजगार मिळाल्याचे दाखवून द्या, असे आम्ही म्हणत आहोत, पण याला उत्तर दिले जात नाही. 

ते म्हणाले, ऊस, दूध उत्पादकांचे प्रश्‍न हे सरकार सोडवू शकले नाही. संपूर्ण कर्जमाफी देणे या सरकारला जमले नाही. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात महिला अत्याचारांत वाढ झाली आहे. हे सरकार पुन्हा निवडून आले तर देशात हुकूमशाही सुरु होऊन घटना शिल्लक राहणार नाही. शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेसने महापालिका क्षेत्रातील रस्ते, पाणी, डे्रनेजचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. काँग्रेसमुळे झालेले रस्ते भाजप आपल्या नावावर खपवित आहे. जयश्री पाटील म्हणाल्या, जातीयवादी शक्तीला सांगलीतील जनतेने अजिबात थारा देऊ नये.सभेला पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, पवित्रा केरीपाळे, आरती वळवडे, किरणराज कांबळे, शालन चव्हाण, जयराज कुकरेजा, आयुब पठाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.