Sun, Apr 21, 2019 06:24होमपेज › Sangli › पाच वर्षे न दिसणारे विकास काय करणार?

पाच वर्षे न दिसणारे विकास काय करणार?

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 9:07PMसांगली : प्रतिनिधी

पाच वर्षे कधीच न दिसणारे आता महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी घोड्यांवरून फिरत आहेत. त्यांना जनतेच्या अडचणी आणि दु:खे काय कळणार? ते भागाचा काय विकास करणार, असा टोला युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंगेश चव्हाण, फिरोज पठाण यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. प्रभाग 15 मध्ये चव्हाण, पठाण, सौ. आरती वळवडे, सौ. पवित्रा केरीपाळे यांचा प्रचाराचा  झंझावात सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी पत्रकारनगर, फौजदार गल्ली, मुजावर प्लॉट, सीतारामनगर, गणेशनगर आदी भागातून प्रचारफेरी काढली. तसेच व्यक्‍तीगत भेटीगाठी, बैठकांद्वारे काँग्रेसच्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. यावेळी नगरसेवक किशोर लाटणे, आयुब पठाण, श्रीमती शालन चव्हाण, माजी नगरसेविका वहिदा ढगे, शरिफा महात, डॉ. चेतन पाटील, विनायक पाटील, सचिन हारगुडे, अजय पाटील, रहिमबक्ष बारगीर, सागर साठे, समीर सोलापुरे, सादिक पठाण, सुफीयान पठाण आदि उपस्थित होते. 

मंगेश चव्हाण म्हणाले, काँग्रेसने शहराच्या विकासाची गंगा वाहती ठेवली आहे. यासाठी आम्ही सर्वतोपरी जनतेत उतरून भागाचा कायापालट करण्यासाठी झटत असतो. गेल्या पाच वर्षांत महापालिका क्षेत्रात ड्रेनेज, पाणी, घरकुल, स्वच्छता, उद्याने निर्मितीसह विविध कामांतून सांगली चांगली झाली आहे. दिलेल्या वचननाम्यापैकी 95 टक्केहून अधिक कामे मार्गीही लावली आहेत. मात्र, भाजपने शहरासाठी काय दिले? आज जे विरोधक उमेदवार आहेत त्यांनी विकासासाठी किती वेळ दिला? फिरोज पठाण म्हणाले, विकासाचे मुद्दे नसल्याने आणि जनतेसमोर जाऊन सांगणार काय, यामुळेच आता विरोधकांनी अनोखा प्रचार सुरू केला आहे. पण या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन काँग्रेस विजयी होणार, महापालिकेत पुन्हा सत्ता स्थापणार,  हे स्पष्ट आहे.