Wed, Aug 21, 2019 19:04होमपेज › Sangli › महापालिका क्षेत्रासाठी भाजपचे योगदान काय?

महापालिका क्षेत्रासाठी भाजपचे योगदान काय?

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 10:08PMसांगली ः प्रतिनिधी 

केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही गेल्या चार वर्षांत सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या विकासासाठी भाजपने कोणते योगदान दिले, असा सवाल काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. 

महापालिका निवडणुकीत भाजप हा काँग्रेस  आघाडीला पर्याय असूच शकत नाही, असेही ते म्हणाले.  ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगलीत झालेल्या प्रचारसभेत ‘सांगली चांगली करू’ असे आश्वासन  दिले होते. मात्र भाजपचे सांगली व मिरजेतील आमदार, खासदार आणि सरकारने सांगलीसाठी काहीही केले नाही. स्मार्ट सिटीमध्ये सांगलीचा समावेश झाला नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. गेल्या चार वर्षांत  महापालिका क्षेत्रावरच नव्हे;तर जिल्ह्यावरही भाजप सरकारने अन्याय केला आहे. 

पाटील म्हणाले,  या  निवडणुकीत भाजपला    कार्यक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रभागातील समस्यांची जाण असलेले असेे उमेदवारही सर्वत्र  उभे करता आले नाहीत. जमेल तसे आणि जमतील तेथून उमेदवार पक्षात आणून त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ज्या गुंड प्रवृत्तीच्या  लोकांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ नये असे आम्ही बजावले होते, त्यांनाच भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले आहे. अशा भाजपला मतदार बिलकूल थारा देणार नाहीत.

ते म्हणाले, भाजप सरकारने लोकांची घोर निराशा केली आहे. निव्वऴ घोषणांचा गदारोळ सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे.  मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही. कृष्णा नदीच्या प्रदूषणावर केवळ टीका केली जाते. मात्र या नदीच्या शुद्धीकरणासाठी भाजप सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत.  वास्तविक ‘नमामि गंगे’ योजनेच्या धर्तीवर ‘नमामि कृष्णा’ अशी योजना आखता आली असती.

महापालिकेची सत्ता भाजपला देऊन उपयोग काय असा सवाल करून पाटील म्हणाले, जिथे त्यांची सत्ता आहे, त्या नागपूर आणि मुंबईत पावसाने लोकांचे किती हाल झाले ते दिसते आहे. इथे त्यांना सत्ता मिळाली तर या तीनही शहरांचे ही मंडळी वाटोळेच करून टाकतील. जकात आणि एलबीटी गेल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून शासनाने पैसे दिले. त्या पैशांतून शहरातील काही रस्ते दुरुस्त करण्यात आले. त्याचे श्रेय भाजपचे नेते घेत आहेत.

काँग्रेस आघाडी सक्षम

विशाल पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्राचा विकास करण्यास काँग्रेस आघाडी सक्षम आणि भक्कम आहे.काँग्रेस पक्ष  एकसंघपणे या निवडणुकीस राष्ट्रवादीच्या साथीने सामोरा जातो आहे. उमेदवार निश्‍चितीपासून  पक्षातील सर्व नेते एकदिलाने काम करीत आहेत. लवकरच आम्ही प्रभागवार प्रचाराला प्रारंभ करीत आहोत.