Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Sangli › ‘चोरीची विहीर सापडली, पुढारी वेब पोर्टलचे आभार’(व्हिडिओ) 

‘चोरीची विहीर सापडली, पुढारी वेब पोर्टलचे आभार’(व्हिडिओ) 

Published On: Jan 23 2018 1:11PM | Last Updated: Jan 23 2018 1:11PMविटा : विजय लाळे 

जे ना असे ललाटी, ते करी तलाठी अशी एक जुनी म्हण आहे. पण अस्तित्वातच नसलेली विहीर कागदावर दाखवून खानापूर तालूक्याच्या महसूल विभागाने खळबळ उडवली होती. याविरोधात संबंधीत अन्याय ग्रस्त कुटुंबाने महसूल भवनाच्या दारात उपोषण केले. ही बाब प्रकाशझोतात आल्यानंतर रातोरात  कागदावरील नोंद रद्द करण्याचा पराक्रम विट्यात घडला आहे. त्‍यामुळे चोरीला गेलेल्‍या विहिरीचा सुगावा लागला अशी चर्चा परिसरात आहे. 

आळसंद (ता. खानापूर ) येथील योगीराज महादेव जंगम यांच्याकडे श्री काशी विश्वेश्वर देवस्थानची (गट क्र. 1674 अ व 1674 ब) अशी वाहिवाटीची इनाम जमीन आहे. त्यापैकी 1674 ब मध्ये पूर्वी पासून तीन विहिरी आहेत. मात्र, या गटात तहसीलदारांच्या आदेशानुसार कोठेच अस्तित्वात नसलेल्या चौथ्या विहिरीची कागदोपत्री नोंद करण्यात आली होती . ही चौथी विहीर नेमकी कोठे आहे ते दाखवा अन्यथा ही विहीर असल्याची बोगस नोंद रद्द करा. अशी मागणी योगिराज जंगम यांनी  केली होती . याबाबत तहसील कार्यालयात उपोषण कर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुद्धा  झाल्या परंतु त्याकडे खात्‍याने कानाडोळा केला होता. महसूल विभागाने ही विहीर दाखवावी अन्यथा ती चोरीस गेल्याचे जाहीर करावे, ते जमले नाही तर अस्तित्वात नसलेली पण कागदोपत्री रंगवून दाखवलेल्या विहिरीची पोकळ नोंद तरी रद्द करावी, या मागणीसाठी जंगम कुटुंब आमरण उपोषणास बसले होते. या बाबतचे वृत्त  पुढारी वेब पोर्टलवर प्रसिध्द होताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली. संबंधित तलाठी,  प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्यात सायंकाळ पासून सूत्रे हलवली गेली आणि रात्री   एक वाजता तहसीलदार रंजना उवरहंडे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. सकाळी आकरा वाजता नायब तहसीलदार एस. डी. पाटील यांनी संबंधित चौथ्या विहिरीची नोंद रद्द केल्याचे पत्र दिले आणि उपोषण कर्त्यांना सरबत देवून आंदोलन संपवले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अँड. बाबासाहेब मुळीक, भाजपचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह माने, मंथन मेटकरी, हिम्मतराव जाधव आदी उपस्थित होते.

अन्यायग्रस्त योगिराज जंगम यांनी पुढारी वेब पोर्टल चे जाहीर आभार मानले.