Thu, Nov 15, 2018 07:27होमपेज › Sangli › विहिरींच्या पेमेंटसाठी लाभार्थींची अडवणूक

विहिरींच्या पेमेंटसाठी लाभार्थींची अडवणूक

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 11:20PMसांगली : प्रतिनिधी

जत येथे विशेष घटक योजनेतून विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पेमेंटसाठी लाभार्थींची अडवणूक केली जात आहे, असा आरोप जत पंचायत समितीच्या सभापती मंगल जमदाडे यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थ समिती सभेत केला. याप्रकरणी चौकशीचे हआदेश अर्थ सभापती अरूण राजमाने यांनी दिले आहेत. 

जिल्हा परिषदेत गुरूवारी अर्थ समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी अरूण राजमाने होते. सदस्य जितेंद्र पाटील, डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे, मंगल जमदाडे, रेश्मा साळुंखे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर तसेच खातेप्रमुख उपस्थित होते. 31 मार्च 2018 अखेर सर्व विभागांकडील निधी व खर्चाचा आढावा घेण्यात आला. जत येथे विशेष घटक योजनेतून विहिरींची कामे सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली तरी बिल अदा केले जात नाही. डार्कझोनचे कारण दाखवून बिले अडवली जातात. विहिर खोदाईवेळी डार्कझोन नसताना पेमेंटवेळीच त्रुटी कशा काढल्या जातात, असा सवाल जमदाडे यांनी केला. दरम्यान याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना चौकशीच्या सुचना राजमाने यांनी दिल्या आहेत. 

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभाग व काही पंचायत समितींनी शाळकरी मुलींसाठी सायकल अनुदान योजना राबविली. बाजारात पुरेसा सायकलींचा स्टॉक नसल्याने सायकल खरेदी करून त्याची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात लाभार्थींना अडचणी येत आहेत. दरम्यान महिला व बालकल्याण विभागाने शाळकरी मुलींसाठी पिंक रंगाची सायकल घेण्याचे निर्देश लाभार्थींना दिलेले आहेत. पिंक रंगाच्या सायकलींचा तुटवडा आहे. यामुळे ठराविक रंगाचा आग्रह धरू नये, अशी मागणी काही सदस्यांनी केली. 

आरोग्य शिबिरे प्रभावी ठरत आहेत. शिबिरासाठी पाच लाखाची तरतूद करावी, अशी विनंती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी केली. त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. निर्लेखित करायच्या जिल्हा परिषद मालकीच्या इमारती, ग्रामपंचायत मालकीच्या इमारतींच्या स्ट्रक्‍चरल ऑडीटसाठी तरतुदीची मागणी करण्यात आली. तासगाव येथील पशुचिकित्सालयातील एक्स रे मशिनच्या दुरुस्तीची मागणी झाली. 

Tags : Sangli, Well, work, wells, completed,  Special, Component, Plan,  payment, beneficiaries