Thu, Jul 16, 2020 09:31होमपेज › Sangli › नववर्षाचे अपूर्व जल्लोषात स्वागत

नववर्षाचे अपूर्व जल्लोषात स्वागत

Published On: Jan 01 2018 2:08AM | Last Updated: Dec 31 2017 10:33PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

नयनरम्य आतषबाजी आणि  नववर्षाच्या शुभेच्छांसह सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तरुणाईमध्ये अपूर्व उत्साह होता. यावेळी सर्वच स्तरांतील नागरिकांनी शुभेच्छांची देवाण-घेवाण केली. दरम्यान, पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे हुल्लडबाजीला मात्र चाप बसल्याचे दिसून आले.       

रात्री घड्याळात बाराचे ठोके पडताच तरुणाईने एकच जल्लोष केला. शहरातील अनेक भागांत गाण्यांच्या तालावर ठेका धरण्यात आला होता. त्याचवेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यामुळे शहर परिसरातील आसमंत उजळून निघाला होता. रात्री बारानंतर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसत होते. अनेकांनी यानिमित्त विविध उपक्रम राबविले होते. 

नववर्षाच्या स्वागतासाठी सांगलीसह मिरजेतील हॉटेल सज्ज झाली होती. आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. खवय्यांसाठी विशेष डिशेसही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईने बर्‍याच दिवसांपासून तयारी केली होती. दरम्यान, शहरात किरकोळ अपवाद वगळता नववर्षाचा स्वागताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्ह्यात राबविलेली नाकाबंदी आणि ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’विरोधी मोहीम यामुळे हुल्लडबाजीला चांगलाच चाप बसल्याचे दिसून आले. एकंदरीत नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले.