Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Sangli › काँग्रेसमधील नव्या युगाचे जिल्ह्यातही स्वागत

काँग्रेसमधील नव्या युगाचे जिल्ह्यातही स्वागत

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 10:28PM

बुकमार्क करा

कडेगाव : प्रतिनिधी

राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे राहुल गांधीकडे जाणार हे निश्चित झाले आहे. अध्यक्ष झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांना होईल अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेसमधील नव्या युगाचे सांगली जिल्ह्यातही स्वागत होत आहे. 

राहुल गांधी युवकांचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यामुळे डॉ. कदम यांना दोन वेळा युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. आजही राहुल गांधींचा सर्वाधिक विश्वास युवकांवर आहे. त्यांना बरोबर घेऊन ते राजकारण करीत असतात. साहजिक 2019 मध्ये होणार्‍या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ते युवकांना प्राधान्य देणार हे निश्चित.

विश्वजित कदम यांनी आपल्या कार्यातून राहुल यांच्यावर छाप पाडली आहे. आज ते त्यांचे सर्वाधिक जवळचे मानले जात आहेत. राहुल यांच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून ज्या तीस मान्यवरांनी सह्या केल्या आहेत, त्यामध्ये डॉ. विश्वजित कदम आणि डॉ. पतंगराव कदम यांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यात भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम आणि डॉ. विश्वजित कदम यांनी जिल्ह्यात काँग्रेसची पकड मजबूत ठेवली आहे.
विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकिर्दीत जिल्ह्यात आणि राज्यात काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांशी कदम घराण्याने जवळीक साधली आहे. हायकमांडशी सतत संपर्क ठेवला आहे. काँग्रेसच्या राज्यस्तरीय, जिल्हा स्तरीय आंदोलनात विश्वजित कदमांनी नेहमीच आक्रमकता दाखवली आहे. मतदारांशी आणि पर्यायाने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचा मोठा संपर्क राहिला आहे.

सांगली जिल्ह्यात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय आराखडे बांधले जाऊ लागले आहेत. त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी व्हावा म्हणून पक्षाकडून आतापासून तयारी सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत  झालेला पराभव काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात काँग्रेसला यश मिळावे म्हणून कदम बंधू प्रयत्न करताना दिसत आहेत.

कदम बंधूनी आजपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काम केले आहे. त्यांनी स्वतःहून कधी पदे मागितली नाहीत.आज जिल्ह्यात, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्याला टक्कर देणार्‍या नेत्याची आज गरज आहे.विशेष करून सांगली जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे असेल तर त्यासाठी सर्वच दृष्टीने खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने आज डॉ. पतंगराव कदम आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे पाहिले जात आहे.