Tue, Nov 20, 2018 00:17होमपेज › Sangli › एक एकर ढबू मिरचीवर तणनाशक फवारले

एक एकर ढबू मिरचीवर तणनाशक फवारले

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 11:02PMतासगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील पानमळेवाडी येथील दत्तात्रय महादेव माने यांच्या एक एकर ढबू मिरचीच्या पिकावर अज्ञाताने तणनाशक फवारले. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. त्यामुळे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे माने यांनी सांगितले. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे यांनी या घटनेची पाहणी करुन पंचनामा केला आहे.

माने यांची पानमळेवाडी गावच्या हद्दीत 15 एकर शेती आहे. यापैकी सव्वा एकर क्षेत्रावर त्यांनी ढबू मिरचीची लागण केली आहे. यासाठी आतापर्यंत  दीड लाख रुपये खर्च केले आहेत. सोमवारी रात्री अज्ञाताने ढबू मिरचीच्या रोपांवर तणनाशक फवारले. मंगळवारी सकाळी हा प्रकार माने यांच्या लक्षात आला. याची माहिती त्यांनी तालुका कृषी कार्यालयाला दिली. 

तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे, कृषी सहाय्यक उत्तम खरमाटे यांच्यासह कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी माने यांच्या शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करुन पंचनामा केला. या नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून माने यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी सांगितले.