Sat, Sep 22, 2018 00:59



होमपेज › Sangli › दोन मोटारसायकलींसह शस्त्र जप्त

दोन मोटारसायकलींसह शस्त्र जप्त

Published On: Jul 23 2018 11:01PM | Last Updated: Jul 23 2018 11:01PM



सांगली : प्रतिनिधी

कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये झालेल्या वाहतूक पोलिस समाधान मांटे यांच्या खुनात वापरलेले धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. तर खुनानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली बुलेटसह मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान सोमवारी पुन्हा हॉटेल रत्ना डिलक्समध्ये पोलिसांकडून पुन्हा तपासणी करण्यात आली. 

मंगळवार दि. 17 रोजी कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्स येथे झाकीर जमादारसह त्याच्या दोन साथीदारांनी वाहतूक पोलिस समाधान मांटे यांचा सपासप वार करून खून केला होता. खून केल्यानंतर झाकीरचे दोन साथीदार राजू नदाफ आणि अन्सार पठाण चालत घटनास्थळावरून निघून गेले होते. तर झाकीर त्याची बुलेट (एमएच 14 ईजे 5656) घेऊन मिसाळवाडी (आष्टा) येथे मेहुण्याकडे गेला होता. तेथे त्याने त्या रात्री मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी सकाळी मेहुणा वासीम शेख याला घेऊन मोटारसायकलवरून (एमए 10 बीएल 9761) दोघे इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे गेले होते. या गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही गाड्या पोलिसांनी कोल्हापूर परिसरातून जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान खून केल्यानंतर धारदार शस्त्र झाकीरने हॉटेलजवळील गटारीत टाकून दिले होते. ते शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. 

दरम्यान सोमवारी पुन्हा गुन्ह्याच्या अनुषंगाने हॉटेल रत्ना डिलक्स परिसरात पोलिसांच्या पथकाने पुन्हा तपासणी केली. यामध्ये मांटे यांचा मृतदेह हॉटेल परिसरातून हलवून फूटपाथवर टाकल्याप्रकरणी हॉटेलचा मालक कुमार कुमसगे, व्यवस्थापक शब्बीर नदाफ यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपणार आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या तरी दारूच्या बिलावरूनच खून झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याआधारेच तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

फोनवरूनच मृतदेह हलवण्यास सांगितले...

हॉटेल रत्ना डिलक्सच्या आवारात मांटे यांचा खून झाल्याची माहिती व्यवस्थापक शब्बीर नदाफने कुमार कुमसगे यांना फोनवरून दिली होती. त्यानंतर कुमसगे याने त्याला फोनवरून मृतदेह हॉटेलच्या आवारातून हलवण्यास सांगितले होते. त्याच्या सांगण्यावरूनच मृतदेह हलवण्यात आला होता. त्यामुळे कुमसगेसह नदाफला पोलिसांनी अटक केली आहे.