Tue, Jul 16, 2019 22:28होमपेज › Sangli › मनपातील घोटाळ्यांची चौकशी करू : चंद्रकांत पाटील 

मनपातील घोटाळ्यांची चौकशी करू : चंद्रकांत पाटील 

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 11:02PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज, कुपवाड शहरातील नागरिकांनी मोठ्या विश्‍वासाने महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती दिली आहे. आता पायाभूत सुविधा सुधारण्याबरोबरच शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न करूच; पण मागील सत्ताधार्‍यांनी केलेले सर्व घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी  केली जाईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केले.

ते म्हणाले, वसंतदादा बँकेत अडकलेल्या महापालिकेच्या पैशांची वसुली तर करूच; पण बँकेतील  घोटाळ्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू. सांगली महापालिकेतील यशाबद्दल आमदार सुधीर गाडगीळ यांनी ना. पाटील यांचे अभिनंदन  केले. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, सुरेश आवटी आदी उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले, जनतेने आम्हाला विकासासाठी सत्ता दिली आहे. त्यानुसार आता शहराच्या विकासासाठी विविध योजना राबवू, स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करू. शहराला चांगल्यात चांगल्या सुविधा आणि उद्योग-व्यवसायाला चालना आदींसाठी प्रयत्न करू. पण हे करताना काँग्रेसने भ्रष्ट कारभार केला होता, त्याचीही चौकशी करू.

वसंतदादा सहकारी बँकेत महापालिकेचे  67  कोटी रुपये अडकले आहेत. बँकेची   चौकशी संथगतीने सुरू आहे, याबद्दलच्या  प्रश्नावर ना. पाटील म्हणाले, मी  सहकारमंत्री असताना अशा चौकशीबाबतचे धोरण निश्चित केले होते. विनाअडथळा तातडीने या चौकशी पूर्ण झाली पाहिजे. शासनाचीही भूमिका व धोरण तसेच आहे. तरीही वसंतदादा बँकेच्या बाबतीत असे का घडते आहे, त्याची माहिती घेऊ.

ते म्हणाले, वसंतदादा बँकेचे प्रकरण मला तोंडपाठ आहे. त्यामुळे त्याबाबत काय करायला हवे, ते मला माहिती आहे. महापालिकेच्या 33 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत अडकल्या आहे. त्या आता व्याजासह 67 कोटींवर गेल्या आहेत. त्याचबरोबर अन्य ठेवीदार व संस्थाही अडकल्या आहेत. महापालिकेची ही रक्कम  जनतेच्या विकासाकरिता मिळवून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करू.

भ्रष्ट कारभाराचे पुरावे : ना. पाटील

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचे अनेक पुरावे शासनाकडे आले आहेत. महापालिकेतूनही त्याबाबत प्रशासनपातळीवर चौकशी केली जाईल. आतापर्यंतच्या  लेखापरीक्षणांनुसार घोटाळे आणि त्याला जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधींचीही चौकशी केली जाईल. यामध्ये विरोधी पक्षात असलेले किंवा आता आमच्याकडे कोणी आले असले तरी त्यांना माफ केले जाणार नाही. ज्याचे-त्याचे पाप त्याच्या पदरात घातले जाईल.