Sat, Jul 20, 2019 23:24होमपेज › Sangli › घाटमाथ्यावर लवकरच टेंभूचे पाणी

घाटमाथ्यावर लवकरच टेंभूचे पाणी

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 9:03PMविटा : विजय लाळे 

टेंभू योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांच्या कामांना गती आल्याने खानापूर आणि कवठेमहांकाळच्या सीमेवर असलेल्या घाट माथ्यावरच्या गावांना टेंभूचे पाणी मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातून पाणी मिळणार असल्याने अग्रणी नदी देखील प्रवाहित होणार आहे. सन 2000 मध्ये भूड पंपगृहाचे डिझाईन करून आणि पंप खरेदी कृष्णा खोरे महामंडळाने केले आहेत. त्या नुसार इतर टप्प्या प्रमाणेच या टप्प्यातून सुध्दा प्रत्येक पंपातून 0.65 घन मीटर प्रति सेकंद प्रति एक हजार हेक्टर इतका पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यासाठी 1 हजार 235 अश्‍वशक्तीचे  4 पंप (स्टॅन्ड बाय म्हणून अधिक एक) ठेवण्यात येणार आहेत. 

या ठिकाणी 1 हजार 800 मिलीमीटर व्यास आणि 2 हजार 300 मीटर लांबीची जलवाहिनी प्रस्तावित होती. याऐवजी 20 मीटर उपसा उंची  वाढवल्यामुळे या ठिकाणी एकूण विसर्ग 4. 32 घनमीटर प्रति सेकंद ऐवजी 3.22 घनमीटर प्रति सेकंद असा होणार आहे. याच जलवाहिनीस  आणखी 1 हजार 220 मीटर लांबीची तेवढ्याच व्यासाची जलवाहिनी जोडण्यात येणार आहे. वेजेगाव आणि भूड या दोन्ही पंपगृहाची कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण होतील, असे सांगण्यात येत आहे. आमदार अनिलराव बाबर यांनी निधीची काळजी करू नका परंतु लवकरात लवकर पाणी घाटमाथ्यावरच्या लोकांना टेंभूचे पाणी मिळाले पाहिजे, अशा सूचना अधिकार्‍यांना आणि कंत्राटदारांना दिल्या आहेत.  त्यामुळे या सार्‍याच कामांना आता चांगलीच गती आलेली आहे.