होमपेज › Sangli › फुकट्यांमुळे पाणी योजना अडचणीत 

फुकट्यांमुळे पाणी योजना अडचणीत 

Published On: Dec 01 2017 9:10AM | Last Updated: Nov 30 2017 8:44PM

बुकमार्क करा

तासगाव : दिलीप जाधव 

महावितरणच्या थकबाकीमुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची अवस्था  बिकट झाली आहे. योजनेच्या पाण्याचा लाभ घेणार्‍या गावांतील फक्त 39 टक्के कुटुंबांकडे अधिकृत नळ कनेक्शन आहेत. एकाच कनेक्शनवर चार - चार घरात पाणी घेऊन 61 टक्के कुटुंबांतील लोक मात्र फुकटच्या पाण्यावर डल्ला मारत आहेत. यामुळे दरवर्षी सुमारे 2 कोटी 40 लाख 40 हजार 800 रुपयांची पाणीपट्टी पाण्यात जात आहे. 

मणेराजुरी, कवठेमहांकाळ - विसापूर, येळावी आणि पेड या चार प्रादेशिक योजनांतून 39 गावांच्या 27 हजार 864 कुटुंबातील 1 लाख 39 हजार 336 लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मणेराजुरी योजनेतून 24 लाख, कवठेमहांकाळ-विसापूर मधून 27 लाख, येळावी योजनेतून 13 लाख आणि पेड योजनेतून 12 लाख लिटरप्रमाणे प्रतिदिन 76 लाख लिटर पाणी दिले जाते. योजना चालविण्यासाठी येणारे वीजबिल, आस्थापना, देखभाल व दुरुस्ती यासाठी येणारा खर्च व पाण्याचा लाभ घेणारी कुटुंबे याचा विचार करुन खासगी नळ कनेक्शनला 1 हजार 800 आणि सार्वजनिकला 500 रुपये पाणीपट्टीची आकारणी केली जाते. ही आकारणी करताना पाण्याचा लाभ घेणार्‍या सर्व कुटुंबाकडून पाणीपट्टी जमा होणे अपेक्षित होते. जर सर्वच कुटुंबांनी अधिकृत नळ कनेक्शन घेतले तर प्रतिवर्षी जवळपास 3 कोटी 68 लाख 95 हजार 396 रुपये पाणीपट्टी जमा होऊ शकते. एवढ्या रक्कमेत चारही प्रादेशिक योजना अविरतपणे चालू राहू शकतात.

कनेक्शन घेताना गावोगावच्या नागरिकांनी झोल केला आहे. एकाच्या नावावर कनेक्शन घेऊन चार-चार घरात पाणी वापरायची शक्कल लढवली आहे. हा फंडा लक्षात येऊनही गाव याला विरोध करायचे सोडून पाठिशी घालण्याचे काम केले आहे. ग्रामपंचायतींनी सुध्दा याकडे कानाडोळा केला. यामुळेच 61 टक्के जनता एकही दमडी न भरता फुकटचे पाणी घेत आहे.

2 कोटी 40 लाखांची पाणीपट्टी पाण्यात 

योजनेचा लाभ घेणार्‍या 39 गावांतील 21 हजार 755 कुटुंबांनी अधिकृत नळ कनेक्शन घेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 8 हजार 399 जणांनीच कनेक्शन घेतले आहे.13 हजार 356 कुटुंबांकडे अधिकृत कनेक्शन नाही परंतु यामधील नागरिक पाण्याचा लाभ घेत आहेत. यामुळे 2 कोटी 40 लाख 40 हजार 800 रुपयांची पाणीपट्टी दरवर्षी पाण्यात जात आहे.