Sat, Mar 23, 2019 02:07होमपेज › Sangli › पावसाअभावी जत तालुक्यातील खरीप हंगाम गेला वाया

पावसाअभावी जत तालुक्यातील खरीप हंगाम गेला वाया

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 11:56PMयेळवी : विजय रुपनूर

जत तालुक्यात  यावर्षी पुरेसा पाऊस  झालेला नाही. परिणामी  ऐन पावसाळ्यातही पिण्याच्या व शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली.  एकीकडे  जिल्ह्यात  कृष्णा आणि वारणा  नद्या भरून वहात आहेत. त्याचवेळी जतसह पूर्वभागाला दुष्काळाशी  सामना करावा लागत आहे. 

तालुक्यातील 28 पैकी सात तलावातील पाणीसाठा पूर्ण संपला आहे.  दोन मध्यम प्रकल्पासह 14 तलावातील पाणीसाठा मृतसंचयाखाली आहे. सनमडी वगळता  बिरनाळसह सहा तलावात सोडण्यात आलेल्या म्हैसाळच्या पाण्यामुळे सध्या  पाणीसाठा उपलब्ध आहे.

यंदा अवकाळी पाऊस झालाच नाही. रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने पाठ  फिरवली. जत तालुक्यातील बळीराजा संकटाशी सामना करीत आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने  दरवर्षी बाजरी व कडधान्याचे विक्रमी उत्पन्न काढणार्‍या  तालुक्यात यावर्षी पेरा वाया गेला आहे. 

गेल्या अडीच महिन्यात तालुक्यात अत्यल्प पाऊस  झाला आहे. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी 457.7 मिमी आहे. आजअखेर 164. 13 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मे मध्ये 2.50 , जूनमध्ये 82.63  आणि जुलैमध्ये 12.13 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

सात तलाव पूर्ण कोरडे

संख व दोड्डनाला  या दोन मध्यम प्रकल्पासह 29 तलाव आहेत. त्यापैकी सोरडी, सिद्धनाथ, तिकोंडी- 1, तिकोंडी 2, पांडोझरी, बेळुंखी व खोजनवाडी अशा सात तलावांतील पाणीसाठा संपला आहे. या तलावात पाण्याचा एकही थेंब शिल्‍लक नाही. 

14 तलाव मृतसंचयाखाली 

सात तलावातील पाणी संपलेले आहे.  संख व दोड्डानाला मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील 14 तलावांतील पाणीसाठाही मृतसंचयाखाली गेला आहे. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. 
तलावांतील सध्याचा पाणीसाठा  ( दशलक्ष घनफूट) संख मध्यम प्रकल्प ( 4.39), दोड्डनाला मध्यम प्रकल्प ( 24.88), सोरडी ( 9.00), भिवर्गी ( 4.00), दरीबडची ( 10.00), अंकलगी ( 0.87),  शेगाव क्रमांक- 2 ( 2.91), वाळेखिंडी ( 36.01), गुगवाड ( 0.52), येळवी ( 11.14), मिरवाड (3.17), डफळापूर (3.22), बिळूर के (0.68), उमराणी (1.09).

सात तलावात उपयुक्त पाणीसाठा

तालुक्यातील सात तलावांत सध्या उपयुक्त पाणीसाठा आहे. सनमडी येथील तलावात 16.88 दशलक्षघनफूट पाणी शिल्लक आहे. उर्वरित सहा तलावांत  म्हैसाळ योजनेमुळे  पाणीसाठा आहे. उर्वरित सहा तलाव व कंसात सध्याचा पाणीसाठा  असा ः बिरनाळ ( 68.92), कोसारी ( 34.90), तिप्पेहळळी ( 13.82), शेगाव क्र. 1 ( 54.27), रेवनाळ ( 15.43), प्रतापपूर ( 19.51).

खरीप हंगाम पूर्ण वाया

पावसाळ्याच्या सुरवातीलाच  शेतकर्‍यांना पुरेशा पावसाची आशा होती. गेल्या तीन महिन्यांत बहुतांश काळ उघडीपच आहे. खरीप वाया गेला आहे. शेतकरी चिंताग्रस्त  झाले आहेत. आता निदान रब्बी हंगामात तरी  हाती काही लागेल का, या विवंचनेत शेतकरी आहेत.  जलयुक्त शिवार आणि पाणी फौंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे  चांगली झाली आहेत.