Mon, Nov 19, 2018 16:48होमपेज › Sangli › कडेगावात पाण्याची तीव्र टंचाई 

कडेगावात पाण्याची तीव्र टंचाई 

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 7:57PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

कडेगाव तालुक्यात  पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  कडेगाव तलावात पाणी सोडले जात नसल्याने टंचाई अधिकच तीव्र बनली आहे. दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कडेगाव जवळील शिवाजीनगर तलावात सोडले जाते. तेथून हे पाणी आटपाडीपर्यंत जाते. परंतु कडेगाव तलावात हे पाणी सोडले जात नसल्याने शेतकर्‍यांत तीव्र संताप आणि नाराजी आहे. गेल्यावर्षी कडेगावसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती.त्यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलन आणि मोर्चानंतर कडेगाव तलावात पाणी सोडण्यात आले. 

कडेगाव तलावात कडेगाव, कडेपूर, नेर्लीच्या पाणी योजनांच्या विहिरी आहेत.याशिवाय या तलावाखाली असणार्‍या सर्व शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून कारखान्याकडून टेंभूची पाणीपट्टी वसूल करण्यात येते. परंतु या तलावात कायमस्वरूपी पाणी सोडले जात नाही.पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांना विचारले असता कडेगाव तलाव टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात नसल्याचे सांगतात. परंतु पाणीपट्टी का वसूल करतात, याचे उत्तर देवू शकत नाहीत. 

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

ऊस बिलातून पैसे कापून घेतले जातात. मग कायमस्वरुपी कडेगाव तलाव टेंभूच्या लाभ क्षेत्रात समावेश करून पाणी का सोडले जात नाही.कडेगाव तलावात कायमस्वरुपी पाणी सोडण्यात यावे. हा तलाव लाभ क्षेत्रात समावेश करून घ्यावा, वसूल केलेल्या पाण्याच्या पाणीपट्टीची पावती पाटबंधारे खात्याने द्यावी, कडेगाव शहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, अशी लोकांची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.