Thu, May 23, 2019 14:32
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › गायीच्या दुधाला पाण्याचा दर : उत्पादक संतप्त

गायीच्या दुधाला पाण्याचा दर : उत्पादक संतप्त

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 8:08PMऐतवडे खुर्द : वार्ताहर

गेल्या काही महिन्यांपासून गायीच्या दूध खरेदी दरात  सतत कपात केली जात आहे. दुधाला पाण्यापेक्षा कमी दर मिळत आहे. अगोदरच हा व्यवसाय तोट्यात सुरू आहे. अशातच  वाढते पशुखाद्याचे दर, कर्ज यामुळे  उत्पादक महागाईच्या वणव्यात भरडला जात आहे. त्यामुळे उत्पादक संतप्त बनला आहे. 

बहुतांश उच्चशिक्षित युवा पिढीनेही नोकरीच्या मागे न लागता लाखो रुपयांची  बँक कर्ज काढून मुक्त गोठा पध्दतीचा अवलंब केला आहे. परंतु गायीच्या दूध खरेदी दरात कपात केल्यामुळे दहा दिवसाच्या दूधबिलात पशुखाद्य, कर्जाचे  व्याज, हप्ते भागत नाही.  मजूर,  पाणी, लाईट बिल, वैरण,  औषधे आदीसाठीही खर्च मोठा आहे. त्यामुळे उत्पादकांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुधाला पाण्याप्रमाणे  म्हणजे 23 रुपयाप्रमाणे लिटर दर मिळत आहे. पशुखाद्यामध्ये   सरकीचे पोते  1000, गोळी पेंडीचे पोते 1100, गहू भुशाचे पोते 900 रुपयांना मिळते. हे दर  महागडे आहेत. तर 3 फॅटच्या दुधाला प्रतिलिटरसाठी 21.50 व  4  फॅटसाठी  24.50 असे तोकडे दर आहेत. लिटरसाठी किमान 40 ते 50 रुपयांपर्यंत दर असणे आवश्यक आहे.