Wed, May 22, 2019 23:23होमपेज › Sangli › वॉचमनचा खून; मित्रालाच अटक

वॉचमनचा खून; मित्रालाच अटक

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:12AMसांगली : प्रतिनिधी

सांडगेवाडी (ता. पलूस) येथे भंगार दुकानाचा वॉचमन विठ्ठल शिंदे याच्या खूनप्रकरणी त्याच्या मित्रालाच अटक करण्यात आली. विजय महादेव पवार (वय 26, रा. पलूस, मूळ रा. वाघोली, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पलूस पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या संयुक्‍त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पलूसचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी दिली. 

पलूसपासून  जवळच  असणार्‍या  तासगाव-कराड रस्त्यालगत असलेल्या स्क्रॅपच्या दुकानात शिंदे गेल्या तीन वर्षांपासून  वॉचमनचे काम करीत होता. गुरुवारी रात्री दुकानाचे मालक जहाँगीर मुजावर दुकान बंद करून पलूसमधील त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर वॉचमन शिंदे रात्रपाळीसाठी कामावर हजर झाला होता. शुक्रवारी सकाळी दुकानात गेल्यानंतर  शिंदे दुकानाच्या मागील बाजूस रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी त्वरित पलूस पोलिस ठाण्यात   याबाबतची  माहिती  दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील पोलिसांसह  घटनास्थळी दाखल झाले. मृत शिंदे यांचे डोके, चेहरा दगडाने ठेचल्याचे दिसून आले.  त्यानंतर दुकानाच्या पाठीमागील बाजूस मृतदेह ओढत नेल्याच्या खुणा तेथे दिसत होत्या. या घटनेनंतर पलूस पोलिसांनी तपासाला गती दिली होती. घटनास्थळावर श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. 

तासगावचे पोलिस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, एलसीबीचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. 

श्‍वानामुळे गुन्हा उघड

खुनाची घटना घटना घडल्यानंतर घटनास्थळी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. श्‍वानाने मीनाक्षी थिएटरपर्यंत माग काढला होता. याच परिसरात श्‍वान बराच वेळ घुटमळत होते. त्यामुळे पोलिसांना शंका आल्याने त्यांनी थिएटरमध्ये चौकशी केली त्यावेळी संशयित विजय पवार तेथे काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मृत विठ्ठल शिंदे आणि विजय पवारचा दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यातून विजयने विठ्ठलला बेदम मारहाण केली होती, अशी माहितीही तपासात पुढे आली होती. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर गुन्हा उघडकीस आला.