पलूस : प्रतिनिधी
सांडगेवाडी (ता. पलूस) येथील भंगार वस्तू खरेदी करणार्या दुकानाच्या देखरेखीसाठी असलेल्या वॉचमनचा निर्घृण खून करण्यात आला आहे. विठ्ठल जगन्नाथ शिंदे (वय 50) असे त्यांचे नाव आहे. मारेकर्याने त्यांचे डोके दगडाने ठेचले आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री झाला.
पलूसपासून जवळच असणार्या तासगाव - कराड रस्त्यालगत असलेल्या स्क्रॅपच्या दुकानात शिंदे हे गेल्या तीन वर्षांपासून वॉचमनचे काम करीत होते. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दुकानाचे मालक जहाँगीर महंमद मुजावर हे दुकान बंद करून पलूसमधील त्यांच्या घरी गेले होते.त्यानंतर वॉचमन शिंदे रात्रपाळीसाठी कामावर हजर झाले होते. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुकानाचे मालक मुजावर तेथे गेले. त्यावेळी शिंदे हा दुकानाच्या मागील बाजूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. त्यांनी त्वरित पलूस पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील सहकारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मृत शिंदे यांच्या डोक्यावर आणि चेहर्यावर दगडाचे तडाखे देण्यात आले आहेत. तेथेच त्या दगडाखाली रक्त साठले होते.त्याच ठिकाणी त्यांची टोपी आणि एक चप्पल पडले होते. मागील बाजूस दुसरे चप्पल पडले होते. त्यांचा मृतदेह पाठीमागील बाजूस ओढत नेल्याच्या खुणा तेथे दिसत होत्या. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत खुनाच्या कारणाचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे पोलिसांनी सांगलीतून श्वानपथक आणि ठसेतज्ञांना पाचारण केले आहे.
श्वानपथकातील कुत्र्याने सांडगेवाडी ते पलूस शहरातील रस्त्यापर्यत धावत जात माग काढला. मात्र त्याच चौकात कुत्रे घुटमळले. त्यामुळे पोलिसांना पुढील शोध घेता आला नाही. ठसेतज्ञांनी वॉचमन वापरत असलेली पाण्याची बाटली, टोपी, चप्पल यावरील ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पलूसच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याबाबत रुक्मीनी विठ्ठल शिंदे (वय 47) यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.