Sat, Aug 24, 2019 21:11होमपेज › Sangli › पन्नास हजारावरील रोख व्यवहारांवर वॉच

पन्नास हजारावरील रोख व्यवहारांवर वॉच

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 9:49PMसांगली : प्रतिनिधी

निवडणुकीमध्ये आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी आता बँका, पतसंस्थांसह रोख व्यवहारावरही वॉच ठेवण्यात येणार आहे. आचारसंहितेअंतर्गत 50 हजारांवरील रोख व्यवहाराचा दैनंदिन लेखाजोखा बँका, पतसंस्थांसह आर्थिक संस्थांनी उपनिबंधकांकडे देण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्‍त रविंद खेबुडकर यांनी दिले आहेत. तहसीलदार शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केल्याचे श्री. खेबुडकर यांनी सांगितले.

आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी वित्तीय संस्था, बँका, पतसंस्था, राष्ट्रीयीकृत बँका यांच्या प्रतिनिधींची बुधवारी पद्मभूषण  वसंतदादा पाटील सभागृहामध्ये बैठक पार पडली. या बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे निरीक्षक व कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, समितीचे अध्यक्ष शरद पाटील, तहसीलदार, उपनिवडणूक अधिकारी तथा उपायुक्‍त सुनील पवार आणि जिल्हा उपनिबंधक यांच्यासह विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

खेबुडकर म्हणाले, आचारसंहितेअंतर्गत गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. यामध्ये आर्थिक उलाढालीवरही निर्बंध आणण्यात आले आहेत. रोखीने 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार यांची दैनंदिन माहिती सहकारी संस्थांनी जिल्हा उपनिबंधक यांचेकडे देऊन द्यावेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकेची माहिती अग्रणी जिल्हा प्रबंधक   लक्ष्मीकांत कट्टी यांच्याकडे द्यावी.  ते म्हणाले, आर्थिक व्यवहार पारदर्शक व्हावेत. आर्थिक व्यवहार करण्यास कोणतीही हरकत नाही.  सर्व व्यवहारावर, हालचालींवर तसेच तारण, वित्तीय, हवाला, दलाल या सर्व बाबींवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी फिरते पथक यांना निवडणूक अधिकारी तथा आयुक्त यांना  निवडणूक आयोगाने तपासणीचे आदेश दिलेले आहेत. 

खेबुडकर म्हणाले, व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेकपोस्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष यामार्फत सर्व आचारसंहिता नियमांचे पालन करण्यासाठी दक्षता घेतल्या जाणार आहेत.   ते म्हणाले, सर्व बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था, नॅशनलाईज बँका यांचे रोकड ही शासकीय वाहनातूनच वाहतूक करणे आवश्यक आहे. या वाहनधारक व संबंधित कर्मचार्‍यांना ओळखपत्र व अधिकृत कागदपत्रे  आवश्यक आहे.