Fri, May 24, 2019 06:50होमपेज › Sangli › वारणेचे पाणी पळविताना खासदार झोपले होते का?

वारणेचे पाणी पळविताना खासदार झोपले होते का?

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी

वारणा नदीतून इचलकरंजीसाठी पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.  जिल्ह्याच्या वाट्याचे हे पाणी पळविले जात असताना खासदार संजय पाटील झोपले होते का, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. ते म्हणाले, इचलकरंजीला पाणी द्यायला हरकत नाही. परंतु यामुळे जिल्ह्यातील वारणाकाठावर पाणीटंचाई होणार आहे. तसेच म्हैसाळ योजनेलाही पाणी कमी पडून त्याचा फटका बसणार आहे.

पाटील म्हणाले, इचलकरंजीला सध्या पंचगंगा व कृष्णा नदीमधून पाणीपुरवठा केला जातो. परंतु त्यांना पाणी अपुरे पडू लागल्यामुळे वारणेतून पाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगेतील पाणी दूषित झाल्याचे व कृष्णेतून येणारी पाईपलाईन मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याची कारणे देण्यात येत आहे. वास्तविक  गळती  दुरुस्त करुन घेणे आवश्यक असते. परंतु दुसर्‍याच्या घरातील शुध्द पाणी स्वतःच्या घरात आणणे असा प्रकार सध्या सुरू झाला आहे. 

ते म्हणाले, वारणा धरणातील सुमारे 1.6 टीएमसी पाणी हे इचलकरंजीसाठी देण्यात येणार आहे. याचा परिणाम थेट शिराळा, वाळवा व मिरज पश्चिम भागातील वारणाकाठच्या गावांवर होणार आहे. वारणा नदीकाठी जर मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जाणार असेल तर उन्हाळ्यात वारणाकाठच्या शेतीला व पिण्याचे पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. 
ते म्हणाले, म्हैसाळ योजनेसाठी वारणेतूनही पाणी घेतले जाते. या  योजनेवर मिरज, कवठेमहंकाळ, जत असे दुष्काळी तालुके अवलंबून आहेत. तेथे पाणी जर कमी पडले तर पुन्हा टँकर सुरू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. 

तर पंचगंगा, कृष्णेचे पाणी कर्नाटकात जाईल

पाटील म्हणाले, इचलकरंजीत पाणी देण्यासाठी कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. पण वारणाकाठावर पाणी कमी पडल्यास दुसरा पर्याय उपलब्ध नाही. यामुळेच पंचगंगेचे पाणी शुध्द करुन ते वापरण्याची गरज आहे. जर पंचगंगेचे व कृष्णेचे पाणी त्यांनी वापरले नाही तर ते पाणी कर्नाटककडे फुकटच जाणार आहे. वास्तविक आपले हक्काचे पाणी सोडून द्यायचे व दुसर्‍यांना तहानलेले ठेवून पाणी घ्यायचे, हा न्याय होऊ शकत नाही. त्यामुळे या घटनेकडे राज्य व केंद्र सरकारने गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.