Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Sangli › प्रभागरचनेसह आरक्षणाची फुटली लॉटरी

प्रभागरचनेसह आरक्षणाची फुटली लॉटरी

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 21 2018 12:10AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेसह आरक्षणाची लॉटरी मंगळवारी फुटली. यातून आशा-निराशेचा खेळ रंगला; तरी चार सदस्य प्रभागांमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांच्या हस्ते येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मनपा शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांच्या हस्ते ही  सोडत काढण्यात आली. 

सकाळी 9 वाजता प्रारूप प्रभाग रचनेची चतु:सीमा व नकाशे नाट्यगृहाबाहेर लावण्यात आले होते. ते पाहण्यासाठी विद्यमान पदाधिकारी, नगरसेवक व इच्छुकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अकरा वाजता आरक्षण सोडतीस सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने कक्ष अधिकारी अतुल जाधव यांच्यासह प्रदीप परब, संतोष चव्हाण आणि जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिनिधी म्हणून उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी त्यांचे स्वागत केले.सोडत प्रक्रिया पारदर्शी व्हावी आणि ती नागरिकांना पाहता यावी यासाठी नाट्यगृहात स्क्रीनच्या माध्यमातून सोडतीची व्यवस्था केली होती. उपायुक्‍त सुनील पवार, स्मृती पाटील, मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी सोडत प्रक्रिया राबवली. 

यावेळी महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, गटनेते किशोर जामदार, सभापती बसवेश्‍वर सातपुते, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, जमील बागवान, संतोष पाटील, मंगेश चव्हाण, संजय कांबळे, मनसेचे दिगंबर जाधव, योगेंद्र थोरात उपस्थित होते.

काचेच्या ड्रममधून आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सन 2011 च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती-जमातीचे प्रभाग व सदस्य संख्या निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार 78 सदस्यांचे 20 प्रभाग करण्यात आले. यामध्ये 18 प्रभाग चार सदस्यांचे व 2 प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. यामध्ये सांगलीवाडीचा प्रभाग क्रमांक 13 व मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 हे दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. उर्वरित 18 प्रभागांत चार सदस्य आहेत. चार सदस्यांच्या प्रभागांत सरासरी 25 हजार 785 आणि तीन सदस्यांच्या प्रभागात सरासरी 19 हजार 338 लोकसंख्या आहे. 78 पैकी अनुसूचित जातींसाठी 11 (महिलांसाठी 6), अनुसूचित जमाती महिला 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग 21 (महिलांसाठी 11) व खुले 45 ( महिलांसाठी 21 ) प्रभाग राखीव आहेत.

मागील वेळेस सांगलीतून पहिल्या प्रभागाचा प्रारंभ झाला होता. मात्र यावेळी  घड्याळाच्या काट्यानुसार रचनेस कुपवाडमधून प्रारंभ झाला. त्यानुसार पहिले दोन प्रभाग कुपवाड, त्यानंतर सात प्रभाग मिरज आणि पुन्हा  फिरून आठवा प्रभाग कुपवाडमार्गे उर्वरित नऊपासून 19 पर्यंत सांगली तर पुन्हा 20 वा प्रभाग मिरजेचा आहे.अनुसूचित जमातीसाठी एक प्रभाग राखीव झाला आहे. प्रथम या प्रभागाची सोडत काढण्यात आली. या प्रवर्गासाठी प्रभाग 20 ब राखीव झाला. यानंतर दोन महिलांसाठी थेट आरक्षण काढण्यात आले. यात प्रभाग 20 ब मधील अनुसूचित जमाती व खुला गटातील 20 क महिलांसाठी आरक्षित झाला. यानंंतर अनुसूचित जातीच्या 11 पैकी 6 महिला प्रभागांसाठी, तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील 21 पैकी 11 प्रभागत महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. 

खुल्या गटातील 45 पैकी 21 जाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांची आरक्षणे सोडत पध्दतीने काढल्यानंतर अन्य काही प्रवर्गातील महिला व खुल्या गटातील महिला तसेच सर्वसाधारण आरक्षणे थेट निश्‍चित करण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी नागरीक व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 

Tags : sangli, sangli news,Ward structure,  reservation broken ,Lottery