Thu, Nov 22, 2018 01:33होमपेज › Sangli › वारणाकाठची केळी इराणच्या आखातात

वारणाकाठची केळी इराणच्या आखातात

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 24 2018 8:55PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

वारणा काठचा अवघा टापू हा हुकमी ऊसपट्टा! मात्र आता या ऊसटापूत देखील शेतकरी उसाला पर्याय ठरणार्‍या पिकांकडे वळू लागला आहे. ‘क्रॉप पॅटर्न’मधील या बदलाचे चित्र आता वारणा खोर्‍यातील शिवारात जाणवू लागले आहे. कोरेगाव येथील बाबासाहेब भगवान पाटील यांनी तीन एकरात तब्बल 110 मे. टन केळीचे उच्चांकी उत्पादन घेतले.    

साधारणपणे केळीचे सर्वसाधारपणे 27 ते 28 मे. टन उत्पादन निघते. मात्र पाटील यांनी एकरी तब्बल 37 टन केळीचे उत्पन्न घेत ऊसशेतीपेक्षा देखील केळी परवडू शकते, हे दाखवून दिले आहे. बाबासाहेब पाटील म्हणाले,  भडकंबे नजीक डोंगरभागात आमची शेती आहे. येथे चार एकरात केळीच्या ‘जी-9’ वाणाची लावण केली आहे. एकरी 1300 रोपे बसविली तर चार एकरात एकूण 5500 रोपे लागली. विहिरीवर ठिबकमुळे पाण्याची  चिंता नव्हती. ठिबकमधूनच खतांचे व्यवस्थापन केले.  या तीन  एकरात तब्बल 110 मे. टन केळीचे उत्पादन निघाले. यातील जवळपास 50 मे. टन केळी  आष्टा येथील महाजन, सागर कोपर्डेकर यांच्या माध्यमातून थेट दुबई, इराण, मस्कत आदी आखाती देशांकडे निर्यात केली. निर्यात केलेल्या केळीस प्रतिकिलोे 10 रु. पासून 30 रुपयांपर्यंत दर मिळाला.  उर्वरित माल वाशी मार्केट, पुणे येथे विकला. केळीच्या पिकाला फक्त वादळी  वार्‍याचाच धोका असतो. मात्र यासाठी देखील  दक्षता म्हणून केळीला आधार दिल्याने बाग सुरक्षित राहिली. तसेच यासाठी गावातील अनुभवी केळी  उत्पादक शेतकरी मोहन मगदूम, रमेश मगदूम, अरुण वसंत पाटील, डी. पी. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

एक एकर केळीचे गणित 

रोपे : 1300, प्रत्येकी दर रु. 15.50
ठिबकचा खर्च : 50 हजार रु. 
खते, औषधे : 25 हजार, 
आंतरमशागत व्यवस्थापन : 25 हजार
उत्पादन : 37 मे. टन 
दर प्रतिकिलो : सरासरी 10.00 रु. 
 निव्वळ उत्पन्न : दोन ते अडीच लाख रु.

नजरेत केळी   

लावण हंगाम दोन, फेब्रुवारी - मार्च मध्ये लागण - सुरू हंगाम
जुलै - ऑगस्ट मध्ये लागण - आडसाली.
सुरु हंगाम : 10 ते 11 महिन्यात एकरी उत्पादन : 30 ते 32 मे. टन.
 आडसाली हंगाम : 13  महिन्यात एकरी उत्पादन : 38 ते 40 मे. टन.

थेट मार्केटिंग

केवळ केळीचे उत्पादन घेऊन चालणार नाही, तर चांगला भाव मिळाला पाहिजे, या विचाराने बाबासाहेब पाटील, त्यांचे जिवलग मित्र  मोहन मगदूम यांनी  या भागातील केळी  कोरेगाव अ‍ॅग्रो प्रोड्यूसर्सच्या माध्यमातून त्यांनी हुकमी बाजारपेठ मिळवून दिली. बाजारात दर कितीही असू दे, कितीही खाली येऊ दे, केळी सात रु. किलोेने खरेदी करण्याचा करार केल्याने शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे.   शेती पिकवून न थांबता उत्पादित मालाचे मार्केटिंग करत  शेतकर्‍यांना दराची हमी दिली.

Tags : Sangli, Sangli News, Warana, banana, export,  irans gulf, Crop Pattern, Farmer