Sun, Mar 24, 2019 08:51होमपेज › Sangli › वारणा काठची ‘सेंद्रीय शाळा’

वारणा काठची ‘सेंद्रीय शाळा’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

हुकमी ऊसपट्टा म्हणून ओळख असलेला वारणा टापू शेतीमध्ये आपले वेगळेपण राखून आहे. चिकुर्डे (ता. वाळवा) येथे  अठरा-एकोणीस वषार्ंंपासून सेंद्रीय शेती करतानाच उसासारख्या पिकांत मिश्र पिकांचे भरघोस उत्पादनाचा उपक्रम यशस्वी ठरला आहे. फार्मसीमध्ये उच्चशिक्षित पदवी घेतलेले श्रीनिवास बापूराव बागल यांनी आपल्या पंधरा- सोळा एकर शेतीत रासायनिक खते टाळत केवळ शेणखत आणि शेतीतच तयार केलेल्या सेंद्रीय खतांचा वापर करत सेंद्रीय शेतीचा पॅटर्न राबविला आहे. त्यांनी किलोभर देखील विकतचे सेंद्रीय खत वापरलेले नाही. घरीच आठ देशी गायी तसेच चार म्हशी असल्याने दुधदुभते हक्काचे!  शेणखत देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यांनी 60 बाय 25 फूट आकाराचेे शेड करुन त्यात सेंद्रीय खत निर्मिती सुरू केली. यातून दरवर्षी आठ मे. टन चांगल्या दर्जाचे सेंद्रीय खत मिळते. दोन दोन एकराचे प्लॉट करुन त्यात ऊस हे मुख्य पीक ठेवले. याला मिश्रपिकांची जोड दिली. बाळभरणीपर्यंत उसात त्यांनी मिश्रपिके घेतली.  कांदे, मेथी, हरभरा, धने, कोबी, फ्लॉवर, भेंडी आदी भाजीपाला, फळभाज्यांची पिके घेतली. यासाठी रासायनिक खतांचा खर्च वाचला आहे. तरी देखील उत्पादन मिळायचे तेवढे येतेच. जमीन शाबूत राहते.

चिकुर्डे येथे 18 वर्षांपासून मिश्रशेती

मिश्र पिकांच्या जेाड्या : विकतचे सेंद्रीय खत वापरले नाही     

केवळ भाजीपाल्याचीच मिश्र पिके न घेता, बागल यांनी मिश्रपिकांच्या जोड्या निश्‍चित केल्या आहेत. उसात सोयाबीन, मेथी, भेंडी, कांदा, लसूण, ज्वारी, मका ही मिश्र पिके ते घेतात. अर्थात केवळ उसावरच न थांबता अन्य प्लॉटमध्ये त्यांनी खपली गव्हाचे पीक घेण्यात सातत्य ठेवले आहे.  मोहरी, वाटाणा, उन्हाळी भुईमूगात तीळ, मका, भेंडी, कांदा घेतला आहे. खपली गव्हातच उडीद,चवाळी, मूग, मेथी आदी मिश्रपिके ते घेतात. यासाठी केवळ शेणखत आणि घरचेच गांडूळ खत वापरले. विकतचे सेंद्रीय खत अजिबात वापरलेले नाही. बागल यांचे तीस एक व्यक्तींचे  कुटुंब आहे. घरासाठी भाजीपाला मुबलक वापरुन दोन एक महिन्यात दहा-बारा हजारांचा भाजीपाला विकला जातो. 

बारोमास..नैसर्गिक शेतीचाच ध्यास

बागल यांनी जाणीवपूर्वक शेतीच्या बांधावर भरगच्च झाडीचे संगोपन केले आहे. पक्ष्यांसाठी ही झाडी नैसर्गिक अधिवास ठरत आहे. हरभर्‍यावरील घाटेअळीचा फडशा पाडून या पक्ष्यांनी जणू बागल यांच्या प्रयोगशीलतेला सलाम केला. या शेतीतून निसर्गाचे संगोपन, शाश्‍वत शेती, नैसर्गिक शेती साकारणारे बागल यांची शेती शेतीची जणू प्रयोगशाळाच बनली आहे. 

सेंद्रीय गुळाची क्रेझ 

बदलत्या काळात आता बाजारात सामान्य आणि जागरुक असणारा ग्राहक विलक्षण चोखंदळ झाला आहे. खात्रीशीर सेंद्रीय उत्पादनांना महाग ठरली तरी वाढती मागणी आहे. बागल हे दरवर्षी सेंद्रीय उसापासून जवळपास 12 मे. टन सेंद्रीय गुळाची निर्मिती करतात. त्यांच्या सेंद्रीय गुळाने सार्‍या भागात नाव कमावले आहे.  वारणा काठच्या या सेंद्रीय शेतीच्या उपक्रम आणि प्रयोगाने अवघ्या राज्यभरात चिकुर्डेचे नाव प्रयोगशील शेतकर्‍यांच्या यादीत पोहोचले आहे. 


  •