Sat, Jul 20, 2019 12:54होमपेज › Sangli › ‘वाळव्या’त उफाळला पाणी योजनांचा श्रेयवाद 

‘वाळव्या’त उफाळला पाणी योजनांचा श्रेयवाद 

Published On: Aug 19 2018 1:33AM | Last Updated: Aug 18 2018 11:41PMइस्लामपूर : मारूती पाटील

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यातील 33 गावांना 58 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील अनेक गावातील योजनांच्या मंजुरीवरून सध्या  श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. या श्रेयवादात योजना रखडू नयेत, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्‍त होत आहे. 

तालुक्यातील अहिरवाडी (91 लाख), ऐतवडे बुद्रूक (45 लाख), बावची (3 कोटी), भडकंबे (1 कोटी 76 लाख), चिकुर्डे (1 कोटी 75 लाख), देवर्डे (38 लाख), दुधारी (40 लाख), फाळकेवाडी (70 लाख), फार्णेवाडी (15 लाख), गाताडवाडी (30 लाख), गोटखिंडी (3 कोटी 50 लाख), हुबालवाडी (60 लाख), कामेरी (3 कोटी 98 लाख), कणेगाव (75 लाख), करंजवडे (80 लाख), कासेगाव (5 कोटी 75 लाख), खरातवाडी (50 लाख), कुरळप (4 कोटी 50 लाख), लवणमाची (72 लाख), माणिकवाडी (50 लाख), मसुचीवाडी (98 लाख), मिरजवाडी (98 लाख), ओझर्डे (50 लाख), पेठ (11 कोटी 50 लाख), पोखर्णी (70 लाख), रेठरेहरणाक्ष (40 लाख), साखराळे (85 लाख), शेणे (70 लाख), शिवपुरी (35 लाख), सुरूल (45 लाख), तुजारपूर (70 लाख), वाळवा (5 कोटी), वाटेगाव (3 कोटी 75 लाख) अशा 33 गावांना 58 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

तालुक्यातील या सर्व योजनांसह सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजलसाठी 466 कोटी तर हातकणंगले मतदारसंघात 225 कोटी रुपयांचा निधी मी पाणीपुरवठा राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंजूर करून आणल्याचे  पाणीपुरवठा राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर वाळवा तालुक्यातील पाणी योजनांची मंजुरी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून मी आणली असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे म्हणण आहे. त्यामुळे या योजनांच्या मंजुरीचा श्रेयवाद सध्या चांगलाच रंगला आहे. 

यातील काही गावातील पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन  जयंत पाटील यांनी केले आहे. तर ना. खोत यांनीही काही योजनांचे उद्घाटन केले आहे. भविष्यात योजनांच्या उद्घाटनावरूनही संघर्ष होण्याची शक्यता आहे.