Sat, Aug 17, 2019 16:14होमपेज › Sangli › सांगली महानगरपालिकेचे आठ नगरसेवक वेटिंगवर

सांगली महानगरपालिकेचे आठ नगरसेवक वेटिंगवर

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 11:41PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या  नूतन नगरसेवकांपैकी राखीव प्रवर्गातील नगरसेवकांपैकी आठजणांनी जात वैधता  प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचे ‘टोकन’ अर्जासोबत जोडले आहे. त्यांना सहा महिन्यांच्या आत  मूळ प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अन्यथा, कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांप्रमाणे अपात्रतेच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रमाणपत्र सादर होईपर्यंत अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे. या नगरसेवकांमध्ये भाजपच्या पाच आणि काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा समावेश आहे. 

अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून निवडणूक लढविताना संबंधित उमेदवारांना जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक असते. तसे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. मात्र, समाजकल्याण विभागात अपुरे कर्मचारी व निवडणूक काळातील  कामाचा ताण यामुळे वेळेत ही प्रमाणपत्रे मिळत नाहीत. परिणामी, अनेकांना निवडणुकीला उभे राहता येत नाही.

ही अडचण लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीत अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केली. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांना केवळ जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी दिलेला पुरावा सादर करण्याची अट  आहे. त्यानुसार त्याला आरक्षित प्रभागातून उमेदवारीस पात्र ठरविले जाते. मात्र उमेदवार निवडून आल्यानंतर त्याला सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास संबंधित नगरसेवकाचे पद रद्द केले जाते. 

कोल्हापूर महापालिकेत अशाच पद्धतीने 19 नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्राचे टोकण देऊन  निवडणूक लढविली होती. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने त्यांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द रद्दबातल ठरविले आहे. 
.
सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीतही नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती गटातून 33 जण निवडून आले आहेत. या नगरसेवकांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यामध्ये 25 नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्रे सादर केली आहेत. मात्र, आठ नगरसेवकांनी  ती सादर केलेली नाहीत. 

या  आठ नगरसेवकांनी अर्ज दाखल करताना केवळ जात वैधता प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी दिलेल्या प्रस्तावाचे टोकन नंबर नमूद केले आहे. त्यांना  फेब्रुवारी 2019 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनाला सादर करावे लागेल. अन्यथा त्यांचे  नगरसेवकपद रद्द होणार आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.

हे आहेत ते आठ नगरसेवक 

भाजप : अस्मिता सरगर (प्रभाग 4 -मिरज), सोनाली सागरे (प्रभाग 8- कुपवाड) , गीता सुतार (प्रभाग 17 -सांगली) नसिमा नाईक (प्रभाग 18-सांगली), अप्सरा वायदंडे (प्रभाग 19- सांगली), काँग्रेस : मनोज सरगर (प्रभाग 11- सांगली), फिरोज पठाण व आरती वळवडे (प्रभाग 15- सांगली),