Tue, Jul 16, 2019 12:16होमपेज › Sangli › आज मतदान

आज मतदान

Published On: Aug 01 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 11:29PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीची राजकीय लढाई  आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी बुधवारी (दि. 1 ऑगस्ट) तीन शहरांत  544 केंद्रांवर मतदान होणार आहे. 451 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडी, एमआयएम तसेच अपक्ष महाआघाडी, अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. शुक्रवारी (दि. 3 ऑगस्ट) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह यंत्रणेची आता धावाधाव सुरू झाली आहे.  महापालिकेच्या पाचव्या टर्मसाठी सत्तेचा रणसंग्राम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. एकूण 20 प्रभागांत 78 जागांसाठी चारसदस्यीय पॅनेलने 18 प्रभागांत, तर तीनसदस्यीय पॅनेलने दोन प्रभागांत लढत होत आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्ता टिकविण्यासाठी, तर भाजप, शिवसेनेसह अनेक पक्ष सत्तांतरासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील आहेत. यामध्ये भाजपने महापालिकेचे सत्ताकेंद्र ताब्यात घेऊ, असा दावा केला आहे. त्याला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. त्यामध्ये काँगे्रेसने 42, राष्ट्रवादीने 29 जागांवर लढत देत आहे. मिरजेत प्रभाग 4 साठी आघाडीने अपक्ष पॅनेलला पाठिंबा दिला, तर सांगलीवाडीत प्रभाग 13 साठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मिरजेतही प्रभाग 5 मध्ये दोन जागांसाठी मैत्रीपूर्ण लढत आहे.भाजपनेही पहिल्यांदाच स्व:बळावर लढतीची तयारी केली आहे. त्यांनी  78 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. एका जागेवर उमेदवाराच्या अर्जाचा घोळ झाल्याने भाजपचे 77 उमेदवार चिन्हावर लढत आहेत. एका जागेवर पुरस्कृत उमेदवार आहे.

शिवसेनेने 51, तर  जिल्हा सुधार समितीनेही 19 जागांवर उमेदवार उभे करीत पहिल्यांदाच ताकदीने उडी घेत मैदान तापविले आहे. स्वाभिमानी विकास आघाडीने 11 जागांवर उमेदवार उभे करीत ही लढाई अस्तित्वाची बनविली आहे. उमेदवारीत डावललेल्या अपक्षांनीही बंडाचा झेंडा फडकविला आहे. यातून सुमारे हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.  अनेक पक्षांनी बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न केले. अखेर 451 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 

गेल्या 15 दिवसांत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका उडविला होता. यामध्ये काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री नसीम खान, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, युवा नेते विशाल पाटील यांनी भाजप-सेनेवर तोफा डागल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अब्दुल सत्तार आदिंनी भाजप-शिवसेनेचा समाचार घेतला. 

भाजपने जिल्ह्यातील सत्तेचे महत्त्वपूर्ण केंद्र ताब्यात घेण्यासाठी अनेक महिन्यांपासून फिल्डिंग लावली होती. त्यादृष्टीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमख यांनी मोर्चेबांधणी केली होती. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या साथीने यासाठी व्यूहरचना ठरविली होती. त्यांच्या प्रचारार्थ सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात सभा, व्यक्‍तिगत भेटीगाठी, संपर्क अभियानावर भर दिला होता. यासाठी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, जलसंधारण राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदींनीही सांगलीत येऊन तोफा डागल्या. 

शिवसेनेसाठी  बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा सभांमधून समाचार घेत प्रचार केला. यासाठी नितीन बाणुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष संजय विभुते, आनंदराव पवार, शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने, जिल्हा संघटक दिगंबर जाधव आदिंनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यांनीही महापालिकेवर भगवा फडकवू, असा त्यांचा दावा आहे. एमआयएमने 8जागा लढवल्या आहेत. त्या पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन औवेसी यांनी प्रचारासाठी सभा घेतल्या.

स्वाभिमानी आघाडीने  माजी आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्यासाठी नेते पृथ्वीराज पवार, गौतम पवार यांनी मोर्चेबांधणी केली आहे.  शहर परिवर्तनाची लढाई असल्याचा दावा जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यासह टीमनेही केला अहे. त्यांनीही प्रचाराचे रान तापविले. रिंगणातील सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. आता याचा फैसला जनता ईव्हीएम मशिनवर मतदानाद्वारे करणार आहे. त्यासाठी बुधवारी मतदान होणार आहे.  यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे एकूण 544 मतदान केंद्रांवर  4 लाख 24 हजार 179 मतदार  मतदान करणार आहेत.