होमपेज › Sangli › मतदारांनीच आणले सत्ताधार्‍यांना भानावर

मतदारांनीच आणले सत्ताधार्‍यांना भानावर

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 12 2018 1:03AMसांगली : चिंतामणी सहस्रबुद्धे

महापालिकेची निवडणूक जिंकून भाजपने मोठी राजकीय लढाई जिंकली आहे.त्यामुळे त्या पक्षाचे राज्यपातळीवरील आणि स्थानिक  नेतेही आता अधिक आत्मविश्‍वासाने बोलू लागले आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी या निवडणुकीत पराभूत झाली. मात्र त्यांचा हा पराभवही तसा निसटसाच आहे. कारण दोन्ही पक्षांमध्ये जेमतेम सहा नगरसेवकांच्या संख्येचे अंतर आहे. त्यामुळे आघाडीचा  अगदी दारुण पराभव झाला आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र अखेर राजकारणात विजय हा विजयच असतो. त्यानुसार बहुमत मिळवलेला भाजप पुन्हा एकदा सत्तेच्या राजकारणात यशस्वी ठरला आहे. 

निवडणुकीच्या निकालांचे सध्या वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण सुरू आहे. मात्र त्यामध्ये ‘नागरी सुविधांची कमतरता’ हा मुद्दा सत्तारुढ काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याबद्दल कुणीच भाष्य करताना दिसत नाही, हे विशेष. तो मुद्दा वगळून पराभवाची कारणमीमांसा शोधली तर निवडणूक हरलेल्या  पक्षाला पुन्हा उभारणी देणे कठीण होणार आहे.  महापालिकेच्या सन 2008मधील निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित महाआघाडीने काँग्रेसची सत्ता हटवली होती. गेल्या म्हणजे सन 2013 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले होते. तरीही दोन्ही काँग्रेसची बेरीज साठ-एकसष्ठपर्यंत पोहोचली होती.

याखेपेस दोन्ही पक्षांनी आघाडी करूनही दोघांना मिळून गेल्या खेपेच्या तुलनेत निम्म्याच जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड ताकद वापरूनही त्या पक्षाला 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सत्ता मिळवलेल्या भाजपने 41 जागा मिळवल्या आहेत. याचा अर्थ बहुमताचा आकड्यांत फारसा फरक नाही.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती.त्याचवेळी अपक्षांची आघाडीही गाजली. या अपक्षांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतीलच बंडखोर अधिक संख्येने होते. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला आयते उमेदवार मिळू नयेत म्हणून अखेरपर्यंत चर्चा ताणली. उमेदवार यादी गोपनीय ठेवली. त्यामुळे अनेक मातब्बर इच्छुक भाजपच्या हाताला लागले नाहीत. परंतु त्यांनी बंडखोरी करून आघाडीलाच अडचणीत आणले. म्हणजे सगळा हिशेब तिथेच आला.

आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते तसे निर्धास्त होते. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर त्यांनी जोरदार टीका सुरू ठेवली होती. त्यातच राज्यातील एकूण सगळ्या परिस्थितीची पार्श्वभूमी होती. त्यामुळे आघाडीचा विजय निश्चित आहे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे पराभवाचा धक्का मोठा जाणवला ही वस्तुस्थिती आहे.

निवडणुकीच्या प्रचारात तसा आघाडीचाच जोर होता. भाजपचा प्रचार तुलनेने थंड होता. फारसा गाजावाजाही सुरू  नव्हता. मात्र अखेर भाजपने  ही लढाई जिंकलीच. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना, पराभूत उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला. आघाडी करूनही पराभव झालाच कसा, या प्रश्नाचे उत्तर आता शोधले जात आहे. मात्र ‘आघाडी करू नका. वेगळे लढा. आवश्यकता भासली तर  नंतर एकत्र येऊन सत्ता स्थापन करा’  असा सल्ला त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी गांभिर्याने घेतला नाही. एवढेच नव्हे तर तसा सल्ला देणार्‍यांना प्रचारातही फारसे सामील करून  घेतले नाही.

आता या निवडणुकीचा चौथा अंक सुरू झाला आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने भाजपच्या विजयाचे आणि आघाडीच्या पराभवाचे विश्वेषण करीत आहे.  ईव्हीम मशीनचा घोटाळा, अपक्षांची बंडखोरी, भाजपने वापरलेले वेगवेगळे उपाय यांची चर्चा जोरात आहे. प्रशासनावरही काहींनी यापूर्वीच आगपाखड केली आहे. काही नेत्यांनी तर निवडणुकीनंतर प्रशासनातील अशा अधिकार्‍यांचा  विचार केला जाईल, असाही इशारा पूर्वीच दिला होता. आता तर  आघाडीच्याच  काही नगरसेवकांनी   काही नेत्यांनाच टार्गेट केले आहे. नेत्यांनीच आमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा प्रयत्न केला असे त्यांचे म्हणणे आहे.

सन 2008 पासूनची महापालिकेची ही तिसरी निवडणूक. प्रत्येक खेपेस लोक सत्तापालट करतात, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. पाच वर्षे कसेही काम केले किंवा केले नाही, तरी चालते, ही परंपरा आता संपली आहे. त्यामुळेच  दहा वर्षांपूर्वी महाआघाडीने तत्कालीन काँग्रेसचा पराभव केला होता. मात्र  त्यांनाही त्यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत. परिणामी पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत लोकांनी पुन्हा सत्तापालट केला. सन 2013 च्या निवडणुकीत महाआघाडीला पराभूत केले आणि काँग्रेसला निवडून दिले. आता भाजपची वेळ आहे. त्यांनाही पाच वर्षांत चांगले काम करून दाखवावे लागणार आहे. किमान नागरी सुविधा  तरी लोकांना द्यावा लागणार आहेत. अन्यथा पाच वर्षांनंतर त्यांच्यावरही लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. 

काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांना महापालिका क्षेत्राचे भलेच करायचे होते. त्यांनी कारभार्‍यांना चांगले काम करा अशा वारंवार सूचना दिल्या होत्या. (स्व.) डॉ. कदम हे तर महापालिकेचे प्रशासन आणि कारभारी यांना वारंवार धारेवर धरायचे. महापालिकेतील टोळीचा कारभार बंद करा. लोकांना सुविधा द्या, असे सांगायचे. मात्र कारभार्‍यांनी त्यांच्या पद्धतीने कारभार सुरू ठेवला. विकासासाठी खर्च पडणारा पैसा नेमका कुठे जात होता, तेच समजत नव्हते. 

महाघाडीची स्थापना करताना आमदार जयंत पाटील यांच्यासमोरही एक निश्चित व्हीजन होते. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांचे स्वरुप बदलावे. त्यांची प्रगती व्हावी असेच जयंतरावांचे उद्दिष्ट होते. मात्र महाआघाडीच्या कारकीर्दीतही ठराविक कारभारीच शिरजोर झाले. त्यांनी नेत्यांचे व्हीजन गुंडाळून ठेवले.परिणामी खराब रस्ते, अशुद्ध पाणीपुरवठा, चौका-चौकात कचर्‍याचे ढीग, बंद पडलेले दवाखाने, मोकाट जनावरांचा मुक्त वावर असे बकाल रूप महापालिका क्षेत्राला आले. गुंठेवारीत तर माणसांना राहणे अशक्य झाले. एकही नवा उद्योग नाही. असलेले बंद पडत चाललेले. व्यापारी त्रस्त अशी सगळी परिस्थिती तयार झाली. 

महापालिका क्षेत्र म्हणजे एक मोठे खेडे आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अगदी सुरुवातीच्या प्रचारसभेत केली होती. तो मुद्दा लोकांना मनापासून पटला असावा. खरे म्हणजे भाजपच्या नेत्यांनी फारसा प्रचार केला नाही. आरोप केले नाहीत. याचे काऱण म्हणजे तीनही शहरांतील नागरिकांना सगळी परिस्थिती दिसतच होती. किंबहुना ते त्या परिस्थितीने त्रस्त झाले होते. त्यामुळे वेगळा प्रचार करून त्यांना तुमच्या भोवती अशी स्थिती आहे, असे सांगण्यात फारसा अर्थ नव्हता. 

चांगला कारभार केलाच पाहिजे

राजकीय विश्वेषण हे होणारच. ते केलेही पाहिजे, मात्र  किमान नागरी सुविधा लोकांना आपण पुरवल्या नाहीत, त्याचा परिणाम या निवडणुकीत  झाला का,  याचे आत्मपरीक्षण आता पराभूतांनी केले पाहिजे. त्याचबरोबर चांगला कारभार केला नाही तर लोक आपल्यालाही सत्तेवरून दूर करतील, याची जाणीव नव्या सत्तारुढ कारभार्‍यांनीही ठेवली पाहिजे. एवढे आत्मपरीक्षण दोन्ही बाजूंकडून झाले, तरी तीनही शहरांना पुन्हा चांगले दिवस येतील.