Tue, Apr 23, 2019 21:50होमपेज › Sangli › मतदार राजा जागा हो... 

मतदार राजा जागा हो... 

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:13AM सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. मिरजेत त्याची तयारी इच्छुकांकडून सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये विकासाची आश्वासने देऊन निवडून येणार्‍यांची संख्या भरपूर असते. निवडणुकीपूर्वी आश्वासने देणारे  आणि नंतर प्रभागाचा विकास न करताच दुसर्‍या प्रभागात निवडणूक लढविणारे असेही अनेकजण असतात. अशा नगरसेवकांची संख्या सध्या वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचीच कसोटी आहे. त्यांच्यातच जागृती येणे आवश्यक आहे. शहराचा आणि आपल्या प्रभागाचा, परिसराचा विकास व्हायचा असेल तर खरोखर काम करणार्‍यांनाच निवडून देण्याची गरज आहे. त्यामुळे आता ‘मतदार राजा जागा हो...आणि विकासाचा धागा हो...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
  

 मिरज शहर हे ऐतिहासिक परंपरा असलेले शहर आहे. मात्र या ऐतिहासिक शहराचा विकास झाला का, या प्रश्‍नाचे उत्तर हे नकारात्मकच असेल. विकास शहराचा नाही तर  काही ठराविक जणांचाच   झालेला दिसतो. या कारभाराला जसे हे कारभारी कारणीभूत आहेत. तसेच लोकही त्याला कारणीभूत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा येथेही दोन बाजू आहेत. एकीकडे आपला विकास करणारे  काही कारभारी आहेत तसेच दुसरीकडे शहराच्या विकासासाठी झटणारेही काही  आहेत. शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणारे केवळ कारभारीच आहेत, असे नव्हे; तर  प्रमाणिकपणे काम करणारे काही सामाजिक कार्यकर्तेही आहेत. मात्र असे कार्यकर्ते सहसा निवडणूक लढवित नाहीत. त्यामुळे प्रामाणिकपणे समाजकार्य  करणारे महापालिकेच्या निवडणूक  प्रक्रियेतून बाहेर राहतात. 
 सन 1998 मध्ये सांगली, मिरज, कुपवाड महापालिका अस्तित्वात आली.  गेल्या 20 वर्षांत म्हणजेच  महापालिका स्थापन झाल्यापासून मिरज शहराला काय मिळाले, याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. काही कामे मार्गी लागली असतील; पण अनेक कामे ही प्रलंबितच राहिली आहेत. शहरात  बाहेरगावाहून कुणी आले तर त्याला दाखविण्यासारखी शहरात एकही सुंदर जागा नाही. एखादे उत्कृष्ठ असे उद्यानही शहरात नाही. भाजी मंडईचा प्रश्‍न जैसे थे आहे. 

निवडणूक आल्या की एकमेंकांवर आरोप -प्रत्यारोप करायचे आणि निवडणूक संपली, की मिरज पॅटर्न आहेच. महापालिका अस्तित्वात आल्यापासून महापालिकेतील काही नगरसेवकांच्या कर्तृत्वामुळे मिरज पॅटर्न हे नाव रूढ झाले. वास्तविक एखादा पॅटर्न हा चांगल्या कामांसाठी ओळखला  जातो. मात्र मिरज पॅटर्न हे नाव कशासाठी मिळाले आहे ते विचारात घेण्याची गरज आहे. 
 गेल्या अनेक निवडणुकांचा विचार करता प्रत्येक खेपेस मतदानाची टक्केवारी कमी होत चालल्याचे दिसते. मतदान हे खरोखरच पवित्र काम आहे.  जागृत जनतेने मतदानच केले नाही तर नंतर कारभाराबद्दल बोलायचा आपल्याला काय अधिकार? नंतर विकास झाला नाही म्हणून आरोळी दिली जाते. आपण मतदान करीत नाही आणि चांगल्या नगरसेवकांची अपेक्षा करतो.  चांगले नगरसेवक निवडून आले तरच शहराच्या विकासाचा मार्ग खुला होईल, याचा आता प्रत्येक मिरजकराने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 
 

मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावच्या हद्दीतून कृष्णा नदीवर आधारित दुष्काळग्रस्त जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी म्हैसाळ जलसिंचन योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. या पाण्यावरून या योजनेच्या सुरूवातीपासून राजकारण सुरू आहे. या पाण्यावरून आजही निवडणुका लढवल्या जातात. आता मिरज शहरासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची अमृत योजना शासनाने मंजूर केली आहे. त्या अमृत योजनेविषयी  वाद सुरू झाला आहे. मिरजेतील काही नेत्यांनी ही योजना पूर्ण झाली पाहिजे असे जाहीर केले आहे. ही योजना धोक्यात येत असताना महपालिकेतील प्रमुख कारभारी काय करीत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये आता या पाणी योजनेचा 
मुद्दा प्रामुख्याने घेतला जाणार हे नक्‍की आहे. त्यामुळे आता शहरातही या योजनेच्या निमित्ताने पाण्यावरून राजकारण खेळले जाणार आहे. हे निश्‍चित. - 

  जालिंदर हुलवान  
Tags :blog,  Voter King aware,sangli news